छत्रपती संभाजीनगर : पोलिसांची परवानगी नसतानाही रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतरणाच्या समर्थनार्थ हजारो हिंदू बांधव एकवटले होते. सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये भगवे वादळ संचारले होते.केंद्र सरकारने नामांतराबाबत घेतलेल्या निर्णयाला विरोध करणार्यांविरोधात या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने ’औरंगाबाद’चे ’छत्रपती संभाजीनगर’ आणि ’उस्मानाबाद’चे ’धाराशिव’ नामांतर करण्यास परवानगी दिली.
मात्र, या निर्णयाला विरोध करत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषण केले. मात्र, याचा विरोध करण्यावरून आधी मनसेनेही मोर्चा काढला आणि आता सकल हिंदू समाजाने ’जनगर्जना मोर्चा’ काढला. यामध्ये आज भाजप तसेच शिवसेना शिंदे गटाचे काही नेतेही सहभागी झाले होते. यावेळी गोहत्या, धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणीदेखील करण्यात आली.
भव्य स्वरुपात निघालेल्या या मोर्चात महिला युवक, युवती हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. भगवे झेंडे, भगव्या टोप्या हातात नामांतराच्या समर्थनाचे फलक घेऊन गगनभेदी घोषणांनी छत्रपती संभाजीनगरचा परिसर अक्षरश: दुमदुमला होता. मोर्चात सहभागी झालेले मंत्री अतुल सावे म्हणाले की, खासदार इम्तियाज जलील यांनी आधी स्वतःच्या घरातील एखाद्या व्यक्तीचे नाव औरंगजेब ठेवावे, त्यानंतर जिल्ह्याचे नाव औरंगाबाद करण्याचा प्रयत्न करावा. शहरातील क्रांती चौकातून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती.
गोहत्या, धर्मांतरविरोधी कायद्याचीही मागणी आणि लव्ह जिहादला विरोध
एमआयएमने छत्रपती संभाजीनगर नामांतराला विरोध करत गेले काही दिवस विभागीय आयुक्तालयासमोर साखळी आंदोलन केले होते. त्यानंतर नामांतराच्या समर्थनार्थ सकल हिंदू समाजातर्फे छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंदू जनगर्जना मोर्चाचे आयोजन करण्यात आले. याशिवाय गोहत्या, लव्हजिहाद व धर्मांतरविरोधी कायदा राज्यासह देशात लागू करण्यात यावा, अशीही मागणी मोर्चेकरांनी केली आहे.
ठाकरे गटाची टीका
छत्रपती संभाजीनगरमधील हिंदू जनगर्जना मोर्चावर ठाकरे गटाच्या नेत्यांनी टीका केली आहे. मोर्चाच्या आडून राजकारण केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
खा. इम्तियाज जलील यांचे नाव मिटवले
क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवताना मान्यवरांची नावं असलेला एक दगडी फलक लावण्यात आला होता. त्यावर असलेले खासदार इम्तियाज जलील यांचे नाव मोर्चेकर्यांनी काळ्या शाईने मिटवून टाकले आहे.हा मोर्चा क्रांती चौकातून औरंगपुर्यात महात्मा फुले चौकापर्यंत आयोजित करण्यात आला होता. मोर्चासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर सभेनंतर मोर्चा विसर्जित करण्यात आला.