नंदुरबार : मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा एक प्रामाणिक व सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तिमत्त्व मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठींबा मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातून जवळपास हजोरोंच्या संख्येने मराठा समाज मुंबई येथील आझाद मैदानावर 26 जानेवारीला पायी जाणार आहेत, अशी माहिती नितीन जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नंदुरबार येथून सकल मराठा समाजातर्फे शनिवार, 20 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, धुळे रोड, नंदुरबार येथे सर्व समाज बांधव एकत्र जमा होऊन मुंबईकडे निघणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व समाज बंधु-भगिनी, युवक व युवती यांनी मोठ्या संख्येने मराठा आरक्षण दिंडी (पदयात्रा) मध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.
मोर्चा नाट्य मंदिरापासून ते अंधारे चौक, नगरपालिका, नेहरू पुतळा, महात्मा गांधी पुतळा, महाराष्ट्र व्यायाम शाळा, सोनार खुंट, डॉ.आंबेडकर पुतळा, नवापूर चौफुली इथपर्यंत मोर्चा काढण्यात येऊन या ठिकाणापासून मुंबईकडे पदयात्रा करणार आहेत.
पदयात्रा शांततेच्या मार्गाने काढण्यात येणार आहे, या पदयात्रेमध्ये सुमारे 2 हजार 500 समाज बांधव व महिला भगिनी जाणार असून या मोर्चात एक रुग्णवाहिका व दोन तज्ञ डॉक्टर्स तपासणीसाठी राहतील अशी माहिती नितीन जगताप यांनी यावेळी दिली आहे. यावेळी उमर्दे येथील उपोषणकर्ते गुलाब मराठे, नवनीत शिंदे, प्रकाश हराळ, अर्जून मराठे, विक्की मराठे आधी उपस्थित होते.