पाकिस्तान, चीनसह भारताला अंतर्गत शत्रूंचा धोका!

जळगाव : हुकूमशाही पद्धतीने वागत असणारा चीन देश संपूर्ण जगावर राज्य करू पाहत आहे. प्रत्येक देशाची थोडी थोडी जागा चोरत किंवा त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करून जमीन गिळंकृत करण्याचे सत्रच सुरू केले असल्याची माहिती ब्रिगेडियर संजय अग्रवाल यांनी दिली.  रविवारी येथील भय्यासाहेब गंधे सभागृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित ‘भारत चीन सीमावाद : काल, आज आणि उद्या’ या विषयावर त्यांनी प्रमुख वक्ते म्हणून प्रकाश टाकला. भारताला ज्याप्रमाणे पाकिस्तान, चीनपासून धोका आहे, त्याचप्रमाणे अंतर्गत शत्रूंपासूनही असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यासपीठावर ब्रिगेडियर अग्रवाल यांच्यासह संघाचे उज्ज्वल चौधरी, प्रमुख पाहुणे प्रमोद संचेती होते. प्रसंगी संघातर्फे दोन स्वयंसेवकांनी वैयक्तिक गीते सादर केली. प्रास्ताविकात चीनचे भारतावर वाढते अतिक्रमण धोक्याची सूचना असून याबाबत सर्वांना याची माहिती व्हावी याकरिता हा कार्यक्रम आयोजित केल्याचे डॉ. तुषार रायसिंग यांनी सांगितले. पाहुण्यांचा परिचय व आभार नीलेश भावसार यांनी मानले.
ब्रिगेडियर अग्रवाल पुढे म्हणाले की, 2020 मध्ये झालेल्या भारत-चीन सीमावादात भारताचे जशाच तसे चोख प्रत्युत्तर चीनला दिले. याच भूमिकेला लक्षात घेता चीन मागे सरकले. चीन ज्याठिकाणी दुर्बल आहे तेथेच भारताने आपली ताकत वाढविणे गरजेचे आहे. चीन कोणतेच कायदे मानत नाही. कारण चीनचे हत्तीचे डोके आहे. सीमेपर्यंतची जमीन आमची आहे, असेच चीन म्हणत असल्याने भारत-चीनमध्ये एल.ए.सी. तर भारत-पाकिस्तानमध्ये सीमेबाबत कायदा लागू असल्याने दोघांमध्ये एल.ओ.सी. आहे. पूर्ण अरुणाचल प्रदेश चीन आपला असल्याचे सांगतो, पण कागदावर कुठेही याचा उल्लेख नाही. कारण भारतात बसूनही काही मंडळी नकाशामध्ये फेरफार करत भारतीयांची दिशाभूल करत आहेत. तर भारतीय सैनिक हिमालयात कबड्डी खेळत चिनी सैनिकांचे मनोबल खच्चीकरण करत आहे. कारण भारताचे सैनिक 36 आठवड्यांचे तर चिनी सैनिक 15 आठवड्यांचे प्रशिक्षण
घेतात.

डोकलाम नव्हे डोकाला
जून 2020 मध्ये भारत-चीन सैन्यात जी चकमक झाली आणि आपले 20 सैनिक वीरगतीला प्राप्त झाले. त्या भागाला चीनने डोकलाम असे नाव दिले असून ते त्यांच्या राज्यकर्त्याने सुचविलेले आहे. तेच नाव भारतीय संबोधतात मूळात या भागाचे नाव डोकाला आहे.

मुस्लिमांवर अत्याचार
चीनमध्ये मुस्लीम धर्मियांवर अत्याचार सुरू असून त्यांना दादी ठेवू न देणे, त्यांच्या नाचण्यावर बंदी तर त्यांनी उभारलेल्या मशिदीवरील मिनार कापून चीनने त्यांच्या पद्धतीने बांधण्याचे बंधनकारक आदेश दिले आहे. याबाबत अनेक समाज माध्यमांनी बातम्या दिल्या आहेत.

87 हजार धरण
चीनने भारतात असलेल्या पँगॉन्ग झील जवळ अतिक्रमण करत रस्ता बनवण्याचे काम केले आहे, तर याच ठिकाणावरून जाणार्‍या ब्रह्मपुत्र नदीवर त्यांच्या भागात पाणी अडवून धरण बांधले आहे. चीनने भविष्यातील पाण्याचे संकट लक्षात घेता 87 हजार धरण नद्यांवर बांधली आहे. पण भारतात याकडे लक्ष नसून रेन हार्वेस्टिंग न करता बोरिंग करून पाणी उपसणे सुरूच आहे.

निर्णय मान्य नाही
2016 मध्ये जमीन बळकावल्याच्या प्रश्नावरून फिलिपाइन्स आंतराष्ट्रीय कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने चीनच्या विरोधात निकाल देत, जमीन परत द्यावी असा आदेश दिला. या आदेशाला चीनने मानत नाही, असे म्हणत आदेश धुत्कारला.

अंतर्गत शत्रू
गेल्या सप्ताहात खलिस्थान्यांचा उपद्रव बघता हाऊस न चालू देणे, अदानी विषयावरून विरोधकांनी जनतेचे लक्ष भटकविण्याचे काम सुरू ठेवले असून लोकशाहीत चर्चा होणे अपेक्षित असताना अशाप्रकारे काम करणारे विरोधक हे एका अर्थाने भारताच्या अंतर्गत शत्रूतेचीच भूमिका पार पाडत असल्याचे कोणाचेही नाव न घेता त्यांनी सांगितले.