आमदार मंगेश चव्हाण यांना जीवे ठार मारण्याची धमकी; चाळीसगावमध्ये महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आक्रमक

चाळीसगाव : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने २१ रोजी धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात टाकळी प्रचा गावाचे माजी सरपंच व मआविचे नेते किसन जोर्वेकर याने आमदार मंगेश चव्हाण यांना भर रस्त्यावर पिस्तूलने गोळ्या घालण्याची जाहीर धमकी दिली होती. या धमकीच्या निषेधार्थ आज भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी बारदानमध्ये बनवलेला किसन जोर्वेकर, माजी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख यांचा चेहरा असलेला पुतळा जाळून निषेध केला.  यावेळी महायुतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

गुन्हा दाखल करण्याची मागणी
घटनेला आता ४८ तास उलटले तरीदेखील या क्षणापर्यंत माजी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासह तेथे उपस्थित एकानेही या वक्तव्याचा निषेध नोंदवला नाही याचा अर्थ त्यांची या वक्तव्याला मूकसंमती होती. लोकसभा निवडणुकीत आलेला पराभव जिव्हारी लागल्याने तसेच आमदार मंगेश चव्हाण यांना विधानसभा निवडणुकीत पराभूत करणे अशक्य वाटत असल्याने चाळीसगाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे माजी खासदार आमदार व पदाधिकारी नैराश्यात गेले आहेत. त्यामुळे सदर धरणे आंदोलन हे पूर्वनियोजित कटाचा भाग असून त्यात मुद्दामहून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हाफ मर्डर, खंडणी, आदी अनेक गुन्हे दाखल असणाऱ्या व्यक्तीला सहभागी केले गेले व त्यांना मुद्दामहून भाषण करण्याची संधी दिली गेली. म्हणून हा कट रचणाऱ्या उन्मेष पाटील, राजीव देशमुख, धरणे आंदोलन आयोजक राष्ट्रवादी शरद पवार गट तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शिवसेना उबाठा गट तालुकाध्यक्ष रमेश चव्हाण व इतर आयोजक पदाधिकारी यांच्यावर देखील प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष नितीन पाटील यांनी पोलिसांकडे केली आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे हे निवेदन देण्यात आले.

शिवाय, चाळीसगाव तालुक्याला सुसंस्कृत अशी राजकीय संस्कृती आहे. अनेकदा वैचारिक वाद झाले मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधीला विरोध म्हणून गोळी मारून ठार करण्याची धमकी दिल्याचा हा निंदाजनक प्रकार प्रथमच घडला आहे. सुसंस्कृत चाळीसगावचे भवितव्य अंधारात नेण्याचे पाप महाविकास आघाडीचे नेते करत असल्याचा आरोपी यावेळी करण्यात आला.