मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आल्याने राजकीय खळबळ उडाली होती. दरम्यान, या धमकी प्रकरणात मंगळुरुमधून एका तरुणीला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच नागपूर पोलिसांची एक टीम तातडीनं बेळगावला रवाना झाल्याची माहिती सूत्रानुसार समोर आली आहे.
नागपूर पोलिसांनी मंगळूरू येथील रजिया नावाच्या तरुणीला ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच गडकरी यांच्या कार्यालयात आलेला धमकीचा फोन आणि रजियाला करण्यात आलेला फोन हे दोन्ही फोन कॉल बेळगावच्या तुरुंगामधूनच झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. तसेच सध्या रजिया नावाची तरुणी मंगळुरुच्या रुग्णालयात दाखल आहे आणि स्थानिक पोलीस तिची चौकशी करत आहेत.
गेल्यावेळी १४ जानेवारीला ज्याच्या नावे बेळगावच्या तुरुंगातून धमकीचे फोन केले होते. त्याच जयेश कांथा ऊर्फ जयेश पुजारी नामक व्यक्तीच्या नावे आज पुन्हा धमकीचे फोन आले होते. दरम्यान या प्रकरणात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात नागपूर पोलिसांनी धंतोली पोलीस स्टेशनमध्ये खंडणी मागणे व धमकी देणे असा गुन्हा दाखल केला आहे. तसेच नागपूर पोलिसांचे एक पथक बेळगावला रवाना झाले आहे.