मलब्याचा ढिगारा ढासळल्याने तीन मजुरांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी

तरुण भारत लाईव्ह । ४ एप्रिल २०२३। छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. विहिरीचे काम सुरु असताना विहिरीलगत असलेला मलब्याचा ढिगारा ढासळल्याने त्याखाली दबून तीन परप्रांतीय मजुरांचा जीव गेला आहे. तर अन्य दोन मजूर गंभीर जखमी झाले आहेत.  ही घटना सोमवारी (3 एप्रिल) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास झोलेगाव शिवारात घडली आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील झोलेगाव शिवारातील येथील साहेबराव करंडे यांच्या शेतामध्ये विहिरीचे काम सुरु होते. विहिरीचे काम जवळपास 25 फूट म्हणजेच चार परसापर्यंत झाले होते. काम सुरु असताना विहिरीचा मलबा लगतच टाकण्यात आला होता. या ठिकाणी राजस्थान येथील मजूर काम करत होते. दरम्यान सोमवारी नेहमीप्रमाणे विहिरीत मजूर काम करत असताना, विहिरीलगत असलेला मलब्याचा ढिगारा अचानक ढासळून तो विहिरीत पडला. त्याचवेळी विहिरीत काम करत असलेले पाचही मजूर मलब्याखाली दबले गेले. ही घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

ही घटना आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शिऊर नागरिकांना माहिती कळवली. त्यामुळे ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. तर याची माहिती शिऊर पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. सीताराम रावत (वय 35 वर्षे), महावीर रावत (वय 38 वर्षे), बनाजी गुज्जर (वय 35 वर्षे) यांचा मृत्यू झाला असून, छोटू भिल्ल (वय 25 वर्षे) आणि रतनसिंग रावत (सर्व, भिलवाडा, राजस्थान) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.