---Advertisement---
जळगाव : आपल्याला शनी आहे, असे सांगून हातचलाखी करून तीन जणांनी वृद्धाच्या हातातील ५० हजार रुपये किमतीची अंगठी चोरून नेली. ही घटना अमळनेर बसस्थानकावर घडली.
चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील बळवंतराव जयवंतराव वाघ (८६) हे आपल्या जावयाकडे गांधली (ता. अमळनेर) येथे सुभाष रामराव देशमुख यांच्याकडे येण्यासाठी बसस्थानकावर आले होते. जावयाने बाजारातून परत येईपर्यंत त्यांना बसस्थानकावर थांबायला सांगितले.
काही वेळाने एक इसम आला आणि त्याने वृद्धाला शेगाव जाणारी बस किती वाजता आहे, अशी विचारपूस केली. वृद्धाने त्याला कंट्रोल केबिनमध्ये विचारावे, असे सांगितले. त्यानंतर दुसरा इसम आला.
त्याने पहिल्याला सांगितले की, त्याच्या घरात सतत भांडण-कटकट होतात. तेव्हा पहिल्याने त्याला सांगितले की, तुला शनी आहे, असे म्हणत त्याने जमिनीवरून खडा उचलून बाबांच्या हातात ठेव म्हणाले.
पहिल्याने वृद्धाला मूठ बंद करायला सांगून काही मंत्र पुटपुटले आणि वृद्धाच्या हातात रुद्राक्ष तयार केला. नंतर तो रुद्राक्ष पहिल्याने घेऊन दुसऱ्या सदस्याच्या हातात दिला आणि देव्हाऱ्यात ठेवायला सांगितले.
संशयिताने आपल्याच सहकाऱ्याकडे दक्षिणा मागितली. त्यावेळी जोडीदाराने त्याला दक्षिणा दिली. त्यानंतर त्याने वृद्धाला सांगितले की, बाबा, तुम्हालाही शनी आहे, तुम्ही पण दक्षिणा द्या. मग त्यांनी वृद्धाजवळील २० रुपयांची नोट घेतली आणि वृद्धाच्या बोटातील अंगठी काढून घेतली.
२० रुपयांच्या नोटेत अंगठी बंद करून दुसऱ्या इसमाला ती वृद्धाच्या खिशात ठेवायला लावली. त्यानंतर वृद्धाला सांगितले की, मागे न पाहता पुढे जा, अंगठी खिशातच राहू द्या. वृद्ध काही अंतर चालल्यानंतर भानावर आला आणि खिशात पाहिले असता अंगठी गायब होती. मागे वळून पाहिल्यावर ते चारही अनोळखी इसम गायब झाले होते.
ही घटना पोलिसांना कळताच पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी तांत्रिक मदतीने शोध घेतला असता, चोरटे दुचाकीवर पळत असल्याचे समजले. ते सरळ शिरपूर टोल नाक्यावर गेले.
त्यांची दुचाकी येताच पोलिसांनी झडप घातली. त्यांनी आपली नावे खुदबू नाजीर मदारी (३०, लकडकोट-येवला), भैय्या आयुब मदारी (२७) आणि शाहरुख ऊर्फ शाहरू हसन मदारी (२५, नगरदेवळा, ता. पाचोरा) असे सांगितले.