---Advertisement---
नंदुरबार : दोंडाईचा येथून विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी नंदुरबार येथे येत असलेल्या व्यापाऱ्याची लूट करण्याचा प्रयत्न झाला. ही घटना सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. व्यापाऱ्याकडून पैशाची पिशवी हिसकावून पळ काढत असताना तिघांना परिसरातील ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
राजेश किशनचंद चैनानी हे सोमवारी दोंडाईचा येथून नंदुरबार येथे राहणाऱ्या बहिणीला भेटण्यासह माल खरेदी करण्यासाठी दुचाकीने नंदुरबार येथे येत होते. यावेळी त्यांच्याकडे कापडी पिशवीत एक लाख रुपये होते.
दरम्यान, रनाळे गाव ओलांडल्यानंतर फरशी पूल ओलांडल्यानंतर मागून जीजे ०५ एचयू ७८९३ या दुचाकीवर आलेल्या तिघांनी राजेश चैनानी यांना लाथा मारून खाली पाडले होते. दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी राजेश यांच्या हातातील पिशवी हिसकावून पळ काढला. तिघेही एक लाख रुपयांची पिशवी घेऊन पळ काढत असल्याचे रनाळे परिसरातील ग्रामस्थांना दिसून आल्यानंतर त्यांनी तिघांचा पाठलाग करुन ताब्यात घेतले.
सचिन किशोरकुमार छाबडीया (३४), रोहित भटू गारुंगे (३२), नरेंद्र गुलाबसिंग सोनवणे (३६) अशी तिघांची नावे आहेत. तिघांविरोधात राजेश चैनानी यांनी नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सचिन किशोरकुमार छाबडिया (३४), रोहित भटू गारुंगे (३२), नरेंद्र गुलाबसिंग सोनवणे (३६) यांच्याविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास पोलिस उपनिरीक्षक जगसिंग परदेशी करत आहेत. तिघेही संशयित दोंडाईचा येथील रहिवासी असून चांगल्या घरातील असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून तिघांची चौकशी सुरु आहे.