---Advertisement---
जळगाव : दरमहा १५ हजारांचा हप्ता दिला नाही तर अवैध गॅस भरल्याचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी देणाऱ्या दोन पोलिसांसह ३ जणांना १२ हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली. ही कारवाई अमळनेरातील मीनाताई ठाकरे व्यापारी संकुलानजीक करण्यात आली.
अमोल राजेंद्र पाटील (३६) व जितेंद्र रमणलाल निकुंभे (३३) या दोन पोलिसांसह खासगी इसम उमेश भटू बारी (४६, रा. सहारा टॉवर, अमळनेर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
तक्रारदार हा अमळनेर येथे धुळे रोडवरील पाचपावली मंदिराजवळ एलपीजी गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरण्याचा व्यवसाय करतो. त्याच्याकडे संशयित दोन पोलिसांनी दरमहा १५ हजारांचा हप्ता दिला नाही तर अवैध गॅस भरल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. यानंतर १२ हजार रुपयांवर तडजोड करण्यात आली.
तक्रारदाराने धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. अमळनेर येथील बहादरपूर रोडवरील मीनाताई ठाकरे शॉपिंग कॉम्प्लेक्सनजीक उमेश बारी याच्या हस्ते १२ हजार रुपयांची लाच घेताना संशयितांना अटक करण्यात आली.
याबाबत अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल, यशवंत बोरसे व पथकाने केली.
---Advertisement---