---Advertisement---
पाचोरा : येथील शिवाजी नगर भागातील रहिवासी आकाश मोरे हत्येप्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. दोन आरोपींना मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, एका अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, मयत आकाश मोरे याच्यावर शनिवारी पोलीस बंदोबस्तात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पाचोरा सूत्रांनुसार, मयताची बहिण हिने पाचोरा पोलिसात दिलेल्या फिर्यादनुसार ४ जुलै रोजी सायंकाळी पाचोरा एसटी बसस्थानक परिसरात माझा भाऊ आकाश कैलास मोरे (वय २६) यास नीलेश उर्फ राव अनिल सोनवणे (र. जनता वसाहत, पाचोरा) व प्रथमेश उर्फ गणेश सुनील लांडगे (रा. शिवाजी नगर, पाचोरा) यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून डोक्यावर, छातीवर, पाठीवर, गोळ्या झाडून त्यास जीवे ठार मारले आहे. शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपींनी आकाश कैलास मोरे याच्यावर गोळीबार केला. तोपर्यंत आरोपी घटनास्थळवरून फरार झाले होते. आकाश मोरे यास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.
यात ६ फायर झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक संजय निकुंभ, पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे, पोलीस उपनिरीक्षक ठाकरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील, राहुल शिंपी, रणजित पाटील, योगेश पाटील, पांडुरंग सोनवणे, अशोक हटकर आदी पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी धाव घेत बस स्थानक परिसरातील परिस्थिती वर नियंत्रण मिळवले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, चाळीसगाव अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, चोपडा उपविभागीय पोलीस अधीक्षक अण्णासाहेब घोलप यांनी भेट देऊन तपासाच्या अनुषंगाने अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या. मयत आकाश मोरेवर गोळीबार करणारे फरार संशयित आरोपी नीलेश सोनवणे व प्रथमेश लांडगे हे स्वतःहून जामनेर पोलीस ठाण्यात हजर झाले व त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना दुचाकी, दोन पिस्तुल, दोन मोबाईलसह पोलिसांनी शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले.
अटकेतील तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता निलेश सोनवणे व शरद पाटील यांना मंगळवारपर्यत पोलीस कोठडी तर अल्पवयीन तरुण प्रथमेश लांडगे याची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपास स्वतः पोलीस निरीक्षक अशोक पवार हे करीत आहेत.
गावठी कट्टा पुरविणारा ताब्यात
जामनेर पोलीस ठाण्यातून आरोपी नीलेश सोनवणे व प्रथमेश लांडगे यांना पाचोरा पोलिसांनी दाखल गुन्ह्यात ताब्यात घेत अटक केली. या गुन्ह्यात चौकशी केली असता आणखी एक आरोपीचे नाव निष्पन्न झाले असून गोळीबार प्रकरणी अटकेतील आरोपींना गावठी कट्टे पुरविल्याप्रकरणी पाचोरा पोलिसांनी शरद उर्फ नाना युवराज पाटील (रा. हुसैनी चौक, बाहेरपुरा, पाचोरा) यास ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.