तीन वर्ष, तीन आयुक्त अन्‌‍ तीन केक

जळगाव :  शहरातील विविध व्यापारी संकुलात असलेल्या बेसमेंटचा वापर पार्किगसाठी न करता त्याचा व्यावसायीक वापर होत आहे. तो थांबवून तेथे पार्किंग करण्यात यावी या मागणीसाठी गेल्या तीन वर्षापासून माहिती अधिकारी कार्यकर्ता दीपक कुमार गुप्ता महापालिकेत पाठपुरावा करत आहेत. मात्र याबाबत ठोस कार्यवाही करण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे. त्यामुळे दर वर्षी गुप्ता आयुक्तांच्या दालनाबाहेर आश्वासनाची पूर्ती करण्यासाठी केक कापत आहेत.

आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना याबाबतचे निवेदन त्यांनी आज गुरूवार,7 डिसेंबर रोजी दिले. त्यानुसार शहरातील खासगी व महापालिकेच्या व्यापारी संकुलात बेसमेंटमध्ये पार्किंगची व्यवस्था करण्याबाबतचा शासन नियम आहे. यामुळे रस्त्यावर पार्किंग न होता रस्ते वाहतुकसाठी खुले होत वाहतुकीची कोंडी टळणार आहे.

बेशिस्त पार्किग अन वाहतूक पोलीसांची कारवाई

व्यापारी संकुलातील बेसमेंटमध्ये पार्किग न करता त्या जागाचा व्यावसायीक वापर केला जात आहे. त्यामुळे वाहनधारक ग्राहक हा वाहन रस्त्यावर बेशिस्तपणे पार्क करत असतात. अशावेळी वाहतुकीची कोंडी होत असते. तर वाहतूक पोलीस अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई करत असतात.

तीन वर्ष, तीन आयुक्त अन्‌‍ तीन केक

याबाबत गुप्ता यांनी 2020 मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. चंद्रकांत डांगे यांना निवेदन दिले होते. त्यानुसार त्यांनी शहरातील व्यावसायीक वापर करण्यात येणाऱ्या 133 बेसमेंटची यादी तयार केली होती. त्यांना नोटीसही दिली होती. यापैकी 37 मालमत्ताधारकांची  सुनावणी पूर्ण करत या मालमत्ता सिल करण्याचे सकारण आदेश दिले होते. तर उर्वरीत 96 मालमत्ताधारकाच्या बाबत निर्णय देण्याचे बाकी होते.

त्यानंतर आलेले आयुक्त कुलकर्णी यांना याबात निवेदन दिले होते. त्यानीही याबाबत कार्यवाही सुरू केली परंतु ते निवृत्त झालेत. त्यानंतर नवनियुक्त आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना याबाबत निवेदन देत बेसमेंटमधील व्यावसायीक वापर बंद करून पार्किग सुरू करण्याबाबत मागणी केली होती. आयुक्त डॉ. गायकवाड यांनी कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मात्र कार्यवाही केली नाही.

खोट्या आश्वासनांचा केक कापून वाढदिवस

गेल्या तीन वर्षापासून हा प्रश्न सुटलेला नाही. कार्यवाही करण्याचे आयुक्तांकडून आश्वासन मिळते परंतु ठोस निर्णय महापालिका घेत नाही. त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून दीपक गुप्ता गांधीगिरी करत आश्वासन दिलेल्या तारखेस महापालिकेत येत आयुक्तांच्या दालनासमोर केक कापून खोट्या आश्वासनांचा वाढदिवस साजरा करत आहेत.