छत्रपती संभाजीनगर : ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शहरात नऊ ठिकाणी छापे टाकले. दरम्यान इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपावरून एकास अटक करण्यात आली आहे. मोहम्मद झोएब खान असे संशयिताचे नाव असून पथकाने त्याला अटक केली आहे, अशी माहिती ‘एनआयए’तर्फे जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धिपत्रकात दिली आहे.
प्रसिद्धिपत्रकानुसार ‘एनआयए’च्या पथकाने संशयिताच्या घरासह नऊ ठिकाणी छापे टाकले असून, या छाप्यात मोबाइल, लॅपटॉपसारखे इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स तसेच दहशतवादाशी संबंधित काही कागदपत्रे जप्त केली आहेत. संशयित मोहम्मद झोएबविरोधात मुंबई येथे गुन्हा दाखल आहे. झोएबसह त्याच्या साथीदारांनी ‘इसिस’सोबत काम करण्यासाठी तसेच त्या दहशतवादी संघटनेशी बांधिलकी ठेवणार असल्याची शपथ घेतल्याचे समोर आले आहे. झोएबसह त्याच्या सहकाऱ्यांविरोधात तरुणांना ‘इसिस’मध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणे, ‘इसिस’च्या विचारसरणीचा तरुणांमध्ये प्रचार-प्रसार करणे आदी जबाबदाऱ्या होत्या. झोएबसह त्याचे सहकारी सोशल मीडियावर तरुणांना हेरून त्यांना इसिसशी जोडून त्या संघटनेत तरुणांची भरती करण्यासाठी अग्रेसर असल्याचेही ‘एनआयए’ने म्हटले आहे.
मोहंमद झोएब खान (४०, रा. बेरीबाग, हर्सूल) वेब डिझाईनर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. तो काही महिन्यांपासून ऑनलाईन पद्धतीने ‘इसिस’च्या संपर्कात असल्याचे ‘एनआयए’च्या निदर्शनास आले होते, तेव्हापासून ‘एनआयए’कडून झोएबवर लक्ष ठेवून होते. झोएब खान आणि इतर संशयित साथीदार हे भारतासह परदेशातील नागरिकांसोबत ‘इसिस’ची दहशतवादी धोरणे पोचविण्यासाठी सतत संपर्कात होते. दहशतवादविरोधी संस्थेने या प्रकरणाचा सखोल तपास करण्यास सुरवात केली आहे.