---Advertisement---
भुसावळ प्रतिनिधी : यावल तालुक्यातील पाडळसे परिसरात वाघाचा धुमाकूळ सुरूच असून, वन विभागाला अद्यापही त्याला पकडण्यात यश आलेले नाही. परिणामी परिसरात वाघाचे दर्शन व पशुधनावरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, स्थानिक ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण कायम आहे.
भोरटेक येथील गुरांच्या गोठ्यावर हल्ला करून एका म्हशीला ठार केल्याच्या घटनेनंतर मंगळवारी (१५ जुलै) संध्याकाळी 3 वाजता एका बकरीला ठार केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर वन विभागाने वाघाला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. मात्र, अनेक प्रयत्न करूनही वन विभागाच्या पथकाला वाघाचा माग काढता न आल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वन विभाग म्हणतंय बिबट्या
यात जो व्हिडिओ आला आहे त्यात वाघ दिसत असल्याचे नागरिक म्हणणे आहे. मात्र वन विभाग बिबट्या म्हणत आहे. त्यामुळे नेमका हा बिबट्या की वाघ हा प्रश्न अनुत्तरित आहेत. दरम्यान, वनपाल विभागाकडून कॅमेरे बसविण्यात यावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रात्रीच्या वेळी शेतात जाणे किंवा घराबाहेर पडणे ग्रामस्थांनी पूर्णपणे थांबवले आहे. शेतीची कामेही दिवसा लवकर आटोपून घेतली जात आहेत. शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची चिंताही पालकांना सतावू लागली आहे. “वाघ कधी आणि कुठे हल्ला करेल याचा भरवसा नाही, त्यामुळे आम्ही जीव मुठीत घेऊन जगत आहोत,” अशी प्रतिक्रिया एका स्थानिक शेतकऱ्याने दिली.
वन विभागाने तातडीने अधिक प्रभावी उपाययोजना करून वाघाला पकडावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे. या परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. वन विभागाने तातडीने पावले उचलून हा वाघ पकडला नाही, तर भविष्यात मोठे आंदोलन छेडण्याचा इशाराही काही ग्रामस्थांनी दिला आहे.