वेध
– संजय रामगिरवार
नव्या व्याघ्र गणनेत देशात ३८०० वाघांचा संचार नोंदविला गेला आहे. गतवर्षी ही संख्या ३७०० होती. त्यातही सर्वाधिक वाघ कर्नाटक आणि मध्य प्रदेशात असल्याचे या पाहणीत पुढे आले आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर येथे ३७५ वाघांचा अनभिषिक्त वावर आहे. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात २०० च्यावर वाघ आहेत. ९ एप्रिलला याबाबतचा अधिकृत आणि सविस्तर अहवाल जाहीर होणार आहे. देशातील व्याघ्र प्रकल्प सुवर्ण महोत्सवी झाले आहेत.r वाघांच्या संवर्धनासाठी आपल्या देशाने नेहमीच सकारात्मक पाऊल उचलले असून या जीवांच्या जागतिक संख्येच्या ७० टक्क्यांपेक्षा जास्त संख्या एकट्या भारतात आहे, हा अभिमानाचा विषय आहे.
वाघांच्या संरक्षणाला महत्त्व देत भारतात १ एप्रिल १९७३ पासून व्याघ्र प्रकल्पाला सुरुवात झाली. त्यावेळी १८ हजार २७८ वर्ग किलोमीटर क्षेत्रात पसरलेले ९ अभयारण्य होते. आता ७५ हजार वर्ग किलोमीटरच्या, जे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या जवळपास २.४ टक्के असेल, एवढ्या विस्तीर्ण परिसरात तब्बल ५३ अभयारण्य स्थापित आहेत. या अभयारण्यात वाघांची संख्या दरवर्षी सरासरी ६ टक्क्यांनी वाढत आहे. एव्हाना शिकारही आधीपेक्षा खूप कमी झाली आहे. येत्या ९ एप्रिलला कर्नाटकातील म्हैसूर येथे व्याघ्र प्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून आयोजित एका समारंभात व्याघ्र गणनेचे नवे आकडे जाहीर करण्यात येणार आहेत.
मागील तीन वर्षांपूर्वीच्या अहवालात देशभरात वाघांची संख्या २९५० एवढी होती. त्यात आता मोठी वाढ होत असल्याचे चित्र आहे. देशातल्या २२ राज्यांतील जंगलांमध्ये व्याघ्र गणना करण्यात आली असून कर्नाटकात ६०० तर मध्य प्रदेशात ५५० वाघांची नोंद आहे. त्या खालोखाल महाराष्ट्रातील ताडोबासह मेळघाट, बोर, नवेगाव, नागझिरा, पेंच, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प तसेच बाह्य क्षेत्रात ३७५ पट्टेरी वाघांची नोंद झाली आहे. अन्न साखळीत वाघ अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. किंबहुना तो वनांची शान आहे. वाघांच्या संख्येत वाढ होणे आणि त्याचे संवर्धन होणे याबाबत यत्किंचितही वाद नाही. पण केवळ संख्यावाढ हा उद्देश न ठेवता वाघांची व्यवहार्य संख्या कायम ठेवण्याचा उद्देश असला तर तो जास्त योग्य ठरेल, असे वाटते. वैज्ञानिक दृष्टीने ठरवलेल्या वाघाच्या आवास क्षमतेवर ते आधारित हवे. सध्या देशात ज्या वेगाने वाघांची संख्या वाढत आहे, तो वेग कायम ठेवता येणार नाही. कारण त्याने मानव-वन्यजीव संघर्ष अधिक वाढेल, असे स्पष्ट मत देशाचे व्याघ्र प्रकल्प प्रमुख तथा अप्पर वन महानिदेशक एस. पी. यादव यांनीही व्यक्त केले आहे.
मात्र, पुढे त्यांनी असेही म्हटले आहे की, अनेक अभयारण्यात वाघांची संख्या कमी आहे. पश्चिम बंगालमधील बक्सा अभयारण्य, ओडिशाचे सतकोसिया आणि सिमलीपाल तसेच मध्यप्रदेशातील सातपुडा व्याघ्र अभयारण्यात वाघांची संख्या त्यांच्या आवास क्षमतेपेक्षा कमी आहे. वाघांना या क्षेत्रात स्थलांतरित करावे लागेल आणि तेथे त्यांच्या संवर्धनासाठी काम करावे लागेलचंद्रपूर जिल्ह्यात उलट स्थिती आहे. येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा आणि बाह्य क्षेत्रात वाघ मोठ्या संख्येने वाढत आहेत. त्यांच्या अधिवासाचा बिकट प्रश्न निर्माण होत असून मानव-वन्यजीव संघर्ष अक्षरश: पेटला आहे. दर दिवसाआड वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थांचा बळी जात आहे. अशावेळी वाघांच्या संख्येचे, अधिवासाचे नियोजन होणे गरजेचे आहे.
या अमृत काळात वाघांबाबत तसे धोरण तयार होणे आवश्यक वाटते. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत योजनाही तयार केल्या आहेत चंद्रपूर जिल्ह्यातून सहा वाघ नवेगाव-नागझिरा अभयारण्यात सोडण्यात येणार आहे. शिवाय नैसर्गिकरीत्या वाघांचे स्थलांतरण व्हावे यासाठी त्यांचे ‘कॅरिडोर’ मोकळे करणे, गरज भासल्यास जंगलातून उड्डाण पूल बांधणे आदी विषयांवर चर्चा घडत आहेतकाही ठिकाणी तसे नियोजनही करण्यात आले आहे. रस्ते व रेल्वे अपघात, मानवी संघर्ष, विजेचा धक्का आणि अन्य कारणांनी होणारे वाघांचे मृत्यूही चटका लावून जाते. त्यावरही वन विभागाने लक्ष दिले पाहिजे, असे वाटते.
९८८१७१७८३२