Bus Accident : नाशिकवरून सूरतला जाणाऱ्या भाविकांच्या बसला रविवारी पहाटे सापुतारा घाटात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 7 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर गावकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशातील काही भाविक खासगी बसने देवदर्शनासाठी नाशिकला आले होते. दर्शनानंतर ते सूरतच्या दिशेने जात असताना, रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सापुतारा घाटातील एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस तब्बल 200 फूट खोल दरीत कोसळली.
हेही वाचा : व्याजाच्या बदल्यात पत्नीकडे शरीरसुखाची मागणी; व्यावसायिकाने संपवले जीवन
अपघाताचा मोठा आवाज झाल्याने गावकरी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचावकार्य राबवत जखमींना बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात हलवले. पोलिसांनीही त्वरित घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट
या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बस चालकाचे नियंत्रण का सुटले, बसचा वेग किती होता, घाटातील वळण धोकादायक होते का, याबाबत पोलीस तपास सुरू आहे.
या दुर्घटनेमुळे भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांचा ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यांच्या कुटुंबीयांना संपर्क केला जात आहे. अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस अधिक तपास करत असून प्रशासनाकडून मदत कार्य वेगाने सुरू आहे.