---Advertisement---
चोपडा : शहरातील बस आगारात हवा भरताना टायर फुटल्याने एक गंभीर तर दुसरा किरकोळ जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात रमेश अहिरे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या हाताला मोठी दुखापत झाली आहे.
चोपडा आगारात बसदुरुस्तीचे काम सुरू होते. रमेश अहिरे (५५) हे कर्मचारी बसच्या टायरमध्ये हवा भरून तपासणी करत असताना अचानक बसचे टायर फुटून उंच उडाले. हा आवाज इतका भयंकर होता की, बस आगारातील आणि स्थानकातील लोक जमा झाले. या अपघातात रमेश अहिरे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या हाताला मोठी दुखापत झाली आहे.
जखमीच्या हातावर करावी लागणार शस्त्रक्रिया
अपघातात जखमी झालेल्या रमेश अहिरे यांना प्राथमिक उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून तत्काळ खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.
मारवड येथे दारू विकणाऱ्यास पकडले
अमळनेर : तालुक्यातील मारवड येथे गावठी दारू विकणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अंतुर्ली येथे सट्टा घेणाऱ्या इसमावर छापा टाकून मारवड पोलिसांनी कारवाई केली आहे. मारवड येथे माळन नदीकाठी मार्तड नारायण चव्हाण हा गावठी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्याने मारवड पोलिसांनी छापा टाकला असता त्याच्याकडे ३ हजार रुपये किमतीची ३० लिटर गावठी हातभट्टीची दारू सापडली. अंतुर्ली येथे सट्टा मटका सुरू असल्याची माहिती मिळाल्याने मारवड पोलिसांनी छापा टाकला असता, प्रवीण हिंमत भिल (२६) हा सट्टयाचे आकडे व पैसे स्वीकारताना आढळून आला. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे