पाचोरा । कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून आरती समाधान पाटील (वय २७, रा. वरखेडी, ता. पाचोरा) या विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना गुरुवार, १३ रोजी उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या मोबाईलमध्ये ध्वनी संदेश रेकॉर्ड करून आपल्यावर अन्याय करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नावे स्पष्टपणे उच्चारली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आरती पाटील या चाळीसगाव येथील सॅटीन क्रेडिट केअर नेटवर्क लिमिटेड कंपनीत ॲसिस्टंट ब्रँच मॅनेजर पदावर कार्यरत होत्या. मात्र, त्याच कार्यालयातील कर्मचारी प्रिन्स कुमार, कपिल वाडपत्रे आणि आकाश कुऱ्हेकर हे सतत तिचा मानसिक छळ करत होते. संतापजनक म्हणजे, आकाश कुऱ्हेकर याने आरतीच्या विश्वासाला तडा देत तिच्यासोबत गैरवर्तन केले. तसेच तिला सातत्याने ब्लॅकमेल करून शारीरिक संबंधासाठी दबाव टाकत होता. जेव्हा आरतीने त्याच्या मागण्यांना ठाम नकार दिला, तेव्हा या त्रिकुटाने तिला कामावरून काढून टाकले.
आरतीने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत २७ जानेवारी २०२५ रोजी चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. मात्र, ही बाब आकाश कुऱ्हेकरला समजल्यानंतर त्याने आरतीसोबत काढलेले फोटो आणि व्हिडीओ पाठवून तिला बदनाम करण्याची धमकी दिली. या धक्क्याने घाबरून आरतीने तक्रार मागे घेतली. मात्र, यातूनही तिचा छळ सुरूच राहिल्याने शेवटी १२ फेब्रुवारी रोजी आपल्या शेतातील विहिरीत उडी घेऊन तिने आपले आयुष्य संपवले.
ही घटना गुरुवार, १३ रोजी उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आरतीच्या कुटुंबीयांसह संपूर्ण गावाने केली आहे.
या दुर्दैवी घटनेने महिलांच्या कार्यस्थळी सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. महिला कर्मचाऱ्यांचा छळ आणि अशा गुन्हेगारांना मिळणारे पाठबळ यावर कठोर कारवाई झाली नाही, तर अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त होत आहे.
आरतीला न्याय मिळाला पाहिजे!
दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी आरतीच्या कुटुंबीयांसह संपूर्ण गावाने केली असून, न्यायासाठी लढा देण्याचा निर्धार आरतीच्या कुटुंबीयांनी केला आहे.