जुगार अड्ड्यावर रेड टाकण्यास गेलेल्या धुळ्यातील पोलिसांवर हल्ला

धुळे : धुळे महानगरपालिका हद्दीत अलीकडेच समाविष्ट झालेल्या वरखेडी येथे यात्रोत्सवादरम्यान जुगाराचा अड्डा रंगला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाल्यानंतर पाच कर्मचारी कारवाईसाठी गेल्यानंतर जुगार्‍यांनी कारवाईला विरोध करीत पाच कर्मचार्‍यांना धक्काबुक्की करीत मारहाण केली. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी 23 जुगार्‍यांविरोधात धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून 19 जुगार्‍यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिस यंत्रणेवरच हात उचलण्याची हिंमत झाल्याने शहरातील गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोलिस कर्मचारी मारहाणीत जखमी
धुळे गुन्हे शाखेतील पोलिस कॉन्स्टेबल योगेश विजय ठाकूर (28) यांच्यासह कॉन्स्टेबल मयूर पाटील, कॉन्स्टेबल मयूर पारधी, कॉन्स्टेबल जगदीश सूर्यवंशी, कॉन्स्टेबल योगेश साळवे हे शहरातील वरखेडी येथे सुरू असलेल्या यात्रोत्सवात बहिरम बाबा मंदिराच्या मागील बाजूस एका घराजवळील जुगार अड्ड्यावर कारवाईसाठी रविवारी रात्री नऊ वाजता गेल्यानंतर झन्ना-मन्ना प्रकार सुरू असताना संशयित विलास राजेंद्र मराठे, लक्ष्मण लोटन पाटील, सुधीर दिगंबर धनगर, विपूल राजेंद्र पाटील, राकेश लोटन पवार, नितीन उर्फ सोनू शिवाजी माळी आदींनी हाताने व बुक्क्यांनी मारहाण करीत दशहत निर्माण केली तसेच शर्टाची कॉलर फाडून शासकीय कर्तव्यात अडथळा आणला.

पोलिस कुमक आल्यानंतर जुगारी जाळ्यात
घडल्या प्रकारानंतर गुन्हे शाखेसह नियंत्रण कक्षाला याची माहिती कळवताच मोठा ताफा जुगार अड्ड्यावर आल्यानंतर 19 जुगारींना अटक करण्यात आली. या प्रकरणी योगेश ठाकूर यांच्या फिर्यादीनुसार 21 जुगार्‍यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.