गोवंश, दुचाकी चोरी करायचा; पोलिसांची चाहूल लागताच व्हायचा फरार, अखेर ठोकल्या बेड्या

जळगाव : गोवंशसह दुचाकी चोरी करणारा सराईत चोरटा गेल्या अनेक दिवसांपासून सुरत येथे फरार होता. तो जळगावात येताच एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने मास्टर कॉलनीतून अटक केली आहे.

जळगाव तालुक्यातील खेडी येथील जितेंद्र एकनाथ चौधरी हे रेमंड कंपनीत नोकरीस असून त्यांची (एम.एच. १९ बी.टी. ८३०२) क्रमांकाची दुचाकी २९ जून रोजी चोरी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात संशयित गोपाल भाईदास शिरसाठ, रा. पिळोदा ता. शिरपुर यास अटक करण्यात आली होती

त्याचे सोबत असलेला त्याचा दुसरा साथीदार अमजद फकीरा कुरेशी हा फरार होता. अमजद हा गुन्हा घडल्यापासून सुरत येथे राहत होता. दरम्यान, तो जळगावात आला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. सुधीर सावळे, इम्रान सैय्यद, विकास सातदिवे, योगेश बारी, सचिन पाटील, साईनाथ मुंढे यांच्या पथकाने अमजद कुरेशी अटक केली आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अमजद कुरेशी याची कसून चौकशी केली असता, त्याने मास्टर कॉलनीतील इक्बाल हॉलजवळील मोकळ्या जागेत बांधलेला गोऱ्हा चोरी केल्याचे उघड झाले आहे. तसेच यापुर्वी त्याच्याविरुद्ध मोटारसायकल चोरीचे पाच गुन्हे दाखल आहे.