महाराष्ट्रातील अनेक भागात धुव्वाधार पाऊस! आज कोणत्या जिल्ह्यांना कोणता अलर्ट? वाचा आजचा वेदर रिपोर्ट

पुणे/जळगाव । महाराष्ट्रात मान्सून पुन्हा पूर्णपणे सक्रिय झाला असून राज्यातील अनेक भागाला मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज म्हणजेच सोमवारी देखील राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या दरम्यान,काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर, अनेक ठिकाणी प्रशासनाने खबरदारी म्हणून यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हवामान खात्याने आज पुण्यासह मुंबईमधील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला असून यलो अलर्ट देण्यात आला आहे. इथे घाट माथ्यावर अतिमुसळधार तर इतर भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सातारा, भंडारा या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय पालघर, ठाणे, सिंधुदूर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांतही मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

तसेच आज पूर्व विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूर आणि गडचिरोलीला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर चंद्रपूर आणि भंडारा येथे रेड अलर्ट आहे. याच पार्श्वभूमीवर शाळा कॉलेजला सुट्टी जाहीर कऱण्यात आली आहे. अकोला, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पश्चिम तसेच उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, नंदुरबार, धुळे जळगाव जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. सातारा, सांगली, कोल्हापूर, तसेच आसापासच्या जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पाऊस होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे