आज कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट; पुढचे २४ तास अस्मानी संकट

मुंबई : राज्यात गेल्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे सर्व नद्या-नाले ओसांडून वाहत असून यामुळे गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. अशात आजही सकाळपासून पावसाचा जोर कायम आहे. हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुढच्या २४ तासांमध्ये राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार असून यामुळे राज्यात ऑरेंज आणि काही भागांना रेड आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात उशिराने दाखल झालेला पाऊस आता सर्वदूर व्यापला असून मुंबई, उपनगरं, रायगड-कोकणासह अनेक भागांत धुवांधार पाऊस झाला. कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, महाड, खेड, चिपळूण आदी भागांना पावसाच्या पाण्याने वेढलं आहे. अशात हवामान खात्याकडून पावसाचा पुन्हा एकदा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सर्वदूर बरसलेल्या दमदार सरींमुळे नदी, नाल्यांना पूर आला आहे. या पुरामुळे अनेक मार्ग बंद पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांना शाळांना सुटी जाहीर करण्याचे केले आहे. वाशिममध्ये रात्रभर मुसळधार झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून शेकडो एकर शेतातील पीकं गेली वाहून गेली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी, महाबळेश्वर, पुणे, लोणावळा आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर जास्त असेल. तर या ५ भागांना आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत. २० जुलैला म्हणजेच ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे.