जळगाव-धुळे दरम्यान या तारखेपासून ‘टोल’ वसुली

तरुण भारत लाईव्ह । जळगाव : तरसोद ता. जळगाव ते फागणे ता.धुळे यादरम्यान सबगव्हाण तालुका पारोळा येथे असलेल्या टोलवर १ जुलैपासून वसुली सुरु होणार आहे. त्यामुळे १ जुलैपासून या रस्त्यावरून धावणार्‍या वाहनांना आता टोल भरावा लागणार आहे. चौपदरीकरण कामाच्या अंतरानुसार ही रक्कम निश्चीत केली जाणार आहे. पारोळा व फागणे बायपासवरुन एप्रिल अखेरीस वाहतूक सुरु होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

तरसोद ते फागणे या ८७.३ किलोमीटर अंतराच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाला २०१९ मध्ये प्रत्यक्षात सुरु करण्यात आली होती. त्यानंतर कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर या रस्त्याचे कामाला बेक्र लागला होता. सुमारे ९४० कोटींच्या या रस्त्याचे ८० टक्के चौपदकरीकरण पूर्णत्वास आले आहे. फागणे, मुकटी व पारोळा येथील बायपास तर एरंडोल येथील उड्डाणपुलाच्या कामाव्यतिरिक्त पाळधी ते फागणेदरम्यान बहुतांश रस्त्याचे चौपदरीकरण आटोपले आहे. चौपदरीकरण झालेल्या रस्त्याच्या तुलनेत संबंधित ठेकेदाराकडून सबगव्हाण येथील केंद्रावर टोल वसूली सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

जळगाव शहराला बायपास वाहतूक

जळगाव शहरातील रस्त्यावर बाहेरून येणार्‍या वाहतूकीचा मोठा ताण निर्माण होतो. त्यामुळे शहरातील वाहतूकीचा ताण कमी करणार्‍या १७.७ किलोमीटर रस्त्याचे काम सप्टेंबर अखेर पूर्ण होणार आहे. या बायपासवर गिरणा नदीवरचा पूल, रेल्वेमार्गातील दोन उड्डाणपूल व तीन भुयारी मार्ग आहेत. तसेच पाळधीजवळ उड्डाणपूल आहे. या कामांसाठी वेळ लागणार आहे. सप्टेंबरनंतर शहरातील वाहतूक कमी होऊन बायपासचा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

 

जून अखेर होणार जळगाव-धुळे रस्ता

जळगाव-धुळे दरम्यानच्या रस्त्याचे काम जून अखेरपर्यंत पूर्ण होऊन १ जुलैपासून साधारण टोल वसूली होईल. मात्र ते काम पुर्ण होण्यावर अंवलंबून आहे. शहराच्या बायपासचे कामही सप्टेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दीष्ट असून त्याप्रमाणे काम सुरू आहे.

– चंद्रकांत सिन्हा, प्रकल्प संचालक, महामार्ग प्राधिकरण