---Advertisement---
देशात प्रथमच होणाऱ्या तिरंदाज प्रीमियर लीगमध्ये (एपीएल) दीपिका कुमारी, धीरज बोम्मदेवरा, ज्योती सुरेखा वेन्नम आणि अभिषेक वर्मा यांच्यासह भारतातील अव्वल तिरंदाज पहिल्या तिरंदाज प्रीमियर लीग (एपीएल) मध्ये भाग घेणार आहेत.
सहा फॅन्चायझी आधारित एपीएल स्पर्धा ही तिरंदाजीमधील पहिला जागतिक उपक्रम आहे. ऑक्टोबरमध्ये यमुना क्रीडा संकुलात ११ दिवसांच्या या स्पर्धेसाठी जगभरातील आघाडीच्या रिकर्व्ह आणि कम्पाऊंड तिरंदाजांना एकत्र आणणार आहे. भारतीय तिरंदाजांशिवाय जागतिक तिरंदाजी आणि आशियाई महासंघाकडून पाठिंबा मिळालेल्या पहिल्या एपीएलमध्ये अव्वल क्रमांकाच्या आंतरराष्ट्रीय तिरंदाजांचाही सहभाग असेल व त्यांना सहा फॅन्चायझींमध्ये विभागले जाणार आहे, परंतु त्यांची नावे अद्याप जाहीर झालेली नाहीत.
पहिल्या हंगामात लिलावाऐवजी ड्राफ्ट सिस्टमचा अवलंब होण्याची शक्यता आहे, यात प्रत्येक संघात आठ सदस्य असतील चार पुरुष आणि चार महिला. संघांमध्ये जास्तीत जास्त दोन परदेशी तिरंदाजांचा समावेश असू शकतो, त्यापैकी किमान एक खेळाडू प्लेइंग फोरचा भाग असणे आवश्यक आहे. रिकर्व्ह आणि कम्पाऊंड तिरंदाज फ्लडलाइट्स अंतर्गत एका अनोख्या सांघिक स्वरूपात अनुक्रमे ७० मीटर आणि ५० मीटर तिरंदाजी करतील.
दीपिका कुमारी भारतीय तिरंदाजांची निवड जागतिक क्रमवारी तसेच भारतीय तिरंदाज संघटनेच्या अलीकडील निवड चाचण्यांवरून करण्यात आली. रिकर्व्हमध्ये, जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेली दीपिका आणि जागतिक क्रमवारीत १४ व्या क्रमांकावर असलेला धीरज अनुभवी तरुणदीप राय आणि अतनु दास यांच्यासह मैदानात आघाडीवर आहेत. इतर महिला रिकर्व्ह तिरंदाजांमध्ये अंकिता भकट व भजन कौर यांचा समावेश आहे, तर पुरुषांच्या श्रेणीत नीरज चौहान, राहुल, रोहित कुमार, मृणाल चौहान, सचिन गुप्ता आणि क्रिश कुमार यांचा समावेश आहे.
कम्पाऊंडमध्ये जागतिक विक्रमवीर ज्योती सुरेखा वेन्नम (क्रमांक ३) आणि जागतिक क्रमवारीत ९ व्या क्रमांकावर असलेला ऋषभ यादव नेतृत्व करत आहेत. त्यांच्यासोबत अनुभवी अभिषेक (क्रमांक १०), प्रथमेश भालचंद्र फुगे (क्रमांक ११), प्रियांश (क्रमांक १६) आणि प्रणीत कौर (क्रमांक १७) आहेत. इतर खेळाडूंमध्ये, अमन सैनी, ओजस देवतळे, साहिल राजेश जाधव आणि चिट्टीबोम्मा जिग्नास पुरुष संघाचे प्रतिनिधित्व करतील, तर प्रीतिका प्रदीप, अवनीत कौर आणि मधुरा धामणगावकर महिला संघाचे प्रतिनिधित्व करतील.