नंदुरबार : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळचा विकासासाठी गतिमान पाऊले उचलली जात आहेत. तोरणमाळचा प्रस्ताव सादर करून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येईल, यासाठी साधारणतः १०० कोटींच्या प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती मंत्रालयात झालेल्या बैठकीत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळच्या विकासासाठी शिवसेना संपर्कप्रमुख तथा आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी शासन स्तरावर प्रयत्न करीत आहेत. तोरणमाळचा विकास झाल्यास जिल्ह्यात स्थलांतराचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार आहे. स्थानिक आदिवासींना त्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल. गेल्या महिन्यात पर्यटन विभागाचे अधिकाऱ्यांनी तोरणमाळला भेट देऊन सर्वेक्षण केले होते.
गुजरात, मध्य प्रदेश राज्यसह नाशिक, पुणे, मुंबईतील पर्यटक देखील तोरणमाळला पर्यटनासाठी येत असतात. परंतु, आवश्यक त्या सोयीसुविधा नसल्याने पर्यटकांच्या हिरमोड होतो. तोरणमाळचा विकासासाठी विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि आमदार आमश्या पाडवी यांनी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे बैठक घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार, बुधवारी अधिकाऱ्यां समवेत बैठक झाली. यावेळी पर्यटन विभागातील अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत आमदार चंद्रकांत रघुवंशी व आमदार आमश्या पाडवी यांनी होम स्टे, यशवंत तलावाचे खोलीकरण, पर्यटकांसाठी सुसज्ज विश्रामगृह, विविध व्यूह पॉईंटची रचना, बोटिंग, रोप वे आदी विकास कामे सुचविले. तोरणमाळच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.