---Advertisement---
जळगाव : वाळू व मुरुमची वाहतूक करणारे ट्रॅक्टर तहसीलदारांनी बेकायदेशीररीत्या जप्त करण्यात आले आहे. असा आरोप चोपडा तालुक्यातील मौजे सत्रासेन ग्रामस्थांनी केला आहे. पेसा क्षेत्रात गाव येत असून प्रधानमंत्री घरकुल योजनेसाठी वाळू व मुरुम वाहतुकीसाठी ग्रामसभेत ठराव करण्यात आला आहे. यानुसारच ही वाहतुक होत असल्याने जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर सोडण्यात यावे, यामागणीकरिता ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले आहे.
मौजे सत्रासेनच्या ग्रामस्थांनी २५ मार्च २०२४ रोजी ग्रामस्थांनी वाळू व मुरुम वाहतुकीचा ठराव पारित केला आहे. या ठरावानुसार पेसा कायदा १९९६ अंतर्गत नियम ३२(२) प्रमाणे गौण खनिजांचा (वाळू, मुरूम, दगड, गोटे, माती इ.) स्थानिक गरजेसाठी वापर करण्याचा ठराव पारित झाला होता. त्यानुसार घरकुल योजनेंतील लाभार्थ्यांना वाळू पुरविण्यासाठी हे ट्रॅक्टर वापरले जात होते.
मात्र, चोपडा ग्रामीण पोलीस व महसूल विभागाने ट्रॅक्टर जप्त करून दंडात्मक कार्यवाहीची नोटीस बजावली आहे. ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे ग्रामस्थांचे मत असून, ट्रॅक्टर विनादंड सोडण्यात यावे अशी मागणी केली आहे. दरम्यान, या मागणीसाठी धरणे आंदोलन पुकारण्यात येणार आहे. या आंदोलनात बापू केशव भिल यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व नागरिक सहभागी होणार आहेत. ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत ट्रॅक्टर सोडण्यात येत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील.
शासकीय अधिकारी पेसा कायद्याची अंमलबजावणी योग्यरित्या करीत नसून आदिवासींवर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत दाद मागण्यासाठी उच्च न्यायलयात जाऊ असा इशाराही यावेळी देण्यात आला. पेसा कायद्याची अंमलबजावणी अधिकारी करीत नसतील तर त्या संबंधित अधिकारी न्यायालयाचा अवमान करत असतील तर त्यांना बडतर्फे करा अशी मागणी करणार असल्याची माहिती आदिवासी एकता परिषदेचे गायकवाड यांनी दिली. तीन दिवसात विनादंड ट्रॅक्टर सोडण्यात आले नाहीतर मोठ्याप्रमाणात जनआंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी त्यांनी दिला.