Tragedy in Pravara River ! जळगावच्या फुटबॉल खेळाडूंनी वाहिली शहीद जवानांना श्रद्धांजली

जळगाव : अहमदनगरच्या प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तींना वाचवण्यासाठी गेलेली एसडीआरएफ पथकाची बोट दुर्दैवाने  पाण्यातबुडाली. या दुर्घटनेत उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू व धुळ्याचे एसडीआरएफ पथकातील जवान राहुल पावरा यांच्यासह तीन जवान शहीद झाले. जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख यांच्या नेतृत्वात शोकसभा घेऊन या तिघांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदी पात्रात बुडालेल्या दोन व्यक्तींना वाचवण्यासाठी धुळ्याचे एसडीआरएफ पथक रवाना झाले होते. बचाव कार्य सुरू असताना, दुर्दैवाने त्यांची बोट पाण्यात बुळाली. या दुर्घटनेत तिघे एसडीआर एफचे जवान शहीद झाले.

या तीन पैकी राहुल पावरा हे राज्य राखीव पोलीस गट धुळे येथे पोलीस कॉन्स्टेबल असले तरी ते एक उत्कृष्ट फुटबॉल खेळाडू होते व फुटबॉल खेळामुळेच त्यांना एसआरपीएफमध्ये नोकरी मिळाली होती. उत्कृष्ट खेळाडू सोबतच ते एक उत्कृष्ट पोहणारे सुद्धा असल्याने त्यांची एस डी आर एफ मध्ये निवड झालेली होती.

अशा या अखिल भारतीय पातळीवर पोलीस दलातर्फे खेळलेल्या फुटबॉल खेळाडूला व त्याचे सहकारी प्रकाश शिंदे व वैभव वाघ यांना श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे जळगाव जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख यांच्या नेतृत्वात शोकसभा घेऊन त्यात श्रद्धांजली अर्पित करण्यात आली.

या शोक सभेत फुटबॉल चे मुलं व मुली खेळाडू तसेच संघटनेचे पदाधिकारी सर्वश्री अब्दुल मोहसीन, मनोज सुरवाडे, राहील शेख, वसीम शेख, प्राध्यापक डॉक्टर अनिता कोल्हे, क्रीडा शिक्षिका छाया बोरसे, हिमाली बोरोले, रोहिणी सोनवणे, उदय फालक आदी उपस्थित होते. फारुक शेख यांनी सर्वप्रथम राहुल पावरा याच्या फुटबॉल खेळाविषयी माहिती विशद केली. नंतर सर्वांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.