ट्रेनला भीषण आग; असा वाचला 500 प्रवाशांचा जीव

नवी दिल्ली : छट पुजेनिमित्त नवी दिल्ली ते दरभंगा चालविल्या जाणाऱ्या क्लोन एक्स्प्रेसला (02570) बुधवारी अचानक आग लागली. ट्रेनही प्रवाशांनी खचाखच भरली होती. आग लागल्याचे लक्षात येताच ट्रेनमध्ये चेंगराचेंगरी झाली. आगीमुळे इर्मजन्सी ब्रेक लावून ट्रेन थांबविण्यात आली. ट्रेन थांबल्यावर प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी बोगीतून उड्या मारल्या. त्यानंतर काही वेळातच रेल्वेच्या तीन बोगींची जळून राख झाली. या दुर्घटनेत स्टेशन मास्टरच्या तत्परतेमुळे ५०० प्रवाशांचा जीव वाचला आहे.

दिल्लीहून दरभंगाच्या दिशेने जाणारी 02570 क्लोन एक्स्प्रेस ट्रेन इटावापूर्वी सराई भूपत स्थानकावरून गेली तेव्हा स्टेशन मास्टरला स्लीपर कोचमधून धूर निघताना दिसला. त्यांनी तात्काळ याची माहिती वॉकीटॉकीच्या माध्यमातून रेल्वे चालक व गार्डला दिली. स्टेशन मास्तरकडून माहिती मिळाल्यानंतर ट्रेन थांबवण्यात आली तेव्हा दोन स्लीपर कोच आणि एक जनरल डबा जळत होता. यामध्ये 8 जण जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले.

एसपी जीआरपी संजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लोन एक्स्प्रेसमधील आग आटोक्यात आणल्यानंतर तिन्ही जळालेल्या बोगी बाहेर काढण्यात आल्या. त्यांच्या जागी नवीन बोगी जोडण्यात आल्या. त्यानंतर ही ट्रेन इच्छित स्थळी रवाना करण्यात आली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. आगीचे खरं कारण काय, याचा शोध घेतला जात आहे. ट्रेनमधील एका प्रवाशाने सांगितलं की, ट्रेनच्या आत चार्जिंग पॉईंटमध्ये कोणीतरी चार्जर लावला होता. तेथून शॉर्ट सर्किट झालं. त्यानंतर धूर निघून आग लागली.