भुसावळ : राज्यातील महसूल संवर्गातील 20 तहसीलदारांच्या बदल्यांचे आदेश राज्य शासनाचे सहसचिव डॉ.माधव वीर यांनी बुधवारी रात्री काढले आहेत. जिल्ह्यातील चाळीसगावसह पारोळा, अमळनेर व जळगावातील कूळ तहसीलदारांची बदली त्यात झाली आहे.
जिल्ह्यातील या अधिकार्यांच्या बदल्या
चाळीसगावचे तहसीलदार अमोल रमाकांत मोरे यांची राहता तहसीलदारपदी बदली झाली असून त्यांच्या जागी श्रीरामपूर तहसीलदार प्रशांत रघुनाथ पाटील बदलून येत आहेत.
शहाद्याचे तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांची नाशिक महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीत बदली झाली असून त्यांच्या जागी त्र्यंबकेश्वर तहसीलदार दीपक गिराणे बदलून येत आहेत.
अमळनेर तहसीलदार मिलिंदकुमार रामदास वाघ यांची अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात (निवडणूक) तहसीलदारपदी बदली झाली असून त्यांच्या जागी अद्याप कुणाची नियुक्ती झालेली नाही.
नंदुरबारचे महसूल तहसीलदार डॉ.उल्हास भाईदास देवरे यांची पारोळा तहसीलदारपदी बदली करण्यात आली आहे तर पारोळा तहसीलदार अनिल बन्सी गवांदे यांची नंदुरबार जि.का.तहसीलदार महसूल तहसीलदारपदी बदली करण्यात आली आहे.
जळगावचे कुळकायदा तहसीलदार महेंद्र माळी यांची शिरपूर तहसीलदारपदी बदली झाल्याने त्यांच्या जागी नियुक्तीच्या प्रतीक्षेतील उषाराणी देवगुणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिरपूरचे तहसीलदार आबा गोविंदा महाजन यांची येवला तहसीलदारपदी बदली करण्यात आली आहे.