आईला शिवीगाळ; जाब विचारणाऱ्या २३ वर्षीय महिलेचा खून; आदिवासी समाज आक्रमक

#image_title

नंदुरबार : शहादा शहरातील मलोनी परिसरात झालेल्या चाकूहल्ल्यात दीपाली चित्ते (वय 23) हिचा मृत्यू झाल्याने आदिवासी समाजात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे पडसाद जिल्ह्यात उमटत असून, दोषींवर कठोर कारवाईची आणि न्यायालयीन कामासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी आदिवासी संघटनांतर्फे प्रशासनाला निवेदनातून करीत आंदोलनांचा इशाराही देण्यात आला आहे.

शहादा तालुक्यातील लोणखेडा गावातील दीपाली चित्ते पती सागर चित्तेसोबत राहत होती. 29 डिसेंबर 2024 रोजी ती मलोनी येथे आईला भेटण्यासाठी गेली होती. त्याच वेळी शेजारी राहणारा रिज्जू कुरेशी आणि त्याची पत्नी यांच्यात दीपालीच्या आई व लहान बहिणीसोबत वाद सुरू झाला. गांजाच्या नशेत असलेल्या रिज्जू कुरेशीने अश्लील भाषेत शिवीगाळ केली. दीपालीने याचा जाब विचारण्यासाठी पुढे जाताच रिज्जू कुरेशीने तिच्यावर चाकूने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत तिला शहाद्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचार अपुरे ठरल्याने तिला सुरत येथे हलविण्यात आले, तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

आदिवासी समाजबांधवांत संताप

दीपालीच्या मृत्यूमुळे आदिवासी समाजातून रोष व्यक्त केला जात असून, घटनेच्या निषेधार्थ शहादा आणि म्हसावद येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. आदिवासी संघटनांनी जिल्ह्यातील तहसीलदारांना निवेदन देत दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी संशयित रिज्जू कुरेशीला अटक केली असून, घटनेचा तपास सुरू आहे. सामाजिक शांतता राखण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

दोषीला फाशी देण्याची मागणी

दीपालीचा पती सागर चित्ते यांनी रिज्जू कुरेशीला फाशी देण्याची मागणी केली असून, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

म्हसावद गावात कडकडीत बंद

म्हसावद ः मलोणी येथे चाकूहल्ल्यात झालेल्या 23 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात तीव्र संताप व्यक्त करीत म्हसावद, अनकवाडा, कोकणवाडा या ठिकाणी मंगळवारी तेथील सर्व समाजबांधवांनी आपापले व्यवहार कडकडीत बंद ठेवले होते. सरपंच युवराज ठाकरे, सत्तार ठाकरे, सचिन पवार, सतिलाल शेमळे, कृष्णा बोरसे, राजेंद्र साळवे, कपिल भोई, गौतम आगळे, नीलेश भामरे, चिंतामण धनगर, जयंत पाटील, प्रकाश सूर्यवंशी, दीपक मोरे, राकेश सोनार, सचिन बेदमुथा यांच्यासह व्यापारी संघटनांनी बंदला पाठिंबा दिला. त्यांनी म्हसावद बंदचे निवेदन पोलिसांना दिले. म्हसावद पोलीस ठाण्याचे साहाय्यक निरीक्षक गणेश वावरे, उपनिरीक्षक जितेंद्र पाटील, किशोर बडगुजर व कर्मचाऱ्यांनी बंददरम्यान चोख बंदोबस्त ठेवला होता.

मलोनी घटनेतील दोषींना शिक्षा करण्याची मागणी

तळोदा : शहादा शहरातील मलोनी परिसरात आईला शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याच्या रागातून चाकूहल्ला झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत एकलव्य आदिवासी युवा संघटनेने संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत तहसीलदार दीपक धिवरे यांना निवेदन देण्यात आले. तसेच न्यायालयीन कामासाठी सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी, अशी मागणीही केली आहे. या वेळी संघटनेचे प्रदेश प्रवक्ता ॲड. गणपत पाडवी, दिलीप पाडवी, कल्पेश पाडवी, दीपक पाडवी, नितेश वसावे, विशाल साठे आदी उपस्थित होते.