जळगाव : सातपुड्याच्या जंगलात वास्तव्यास असणाऱ्या एका आदिवासी महिलेची भररस्त्यात प्रसूती झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चोपडा तालुक्यातील बोरमडी येथे ही घटना घडली आहे. या घटनेनंतर आदिवासी बांधवांमध्ये संतापाची लाट उसळली असून, जबाबदार यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरमडी गावातील महिलेला प्रसूती कळा असह्य झाल्यानंतर तिला वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्राकडे नेण्यासाठी तिच्या पतीने धाव घेतली. भररस्त्यातच तिला वेदना सुरू झाल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांनी साडी आडवी लावत तिची प्रसूती केली. भररस्त्यावर प्रसूती होत असतानाही अर्ध्या तासानंतरही वैद्यकीय यंत्रणा सरसावली नाही. एकाने याचा व्हिडीओ व्हायरल केला. त्यानंतर अनेकांनी हा प्रकार पाहून संबंधित यंत्रणेला कळविला.
दरम्यान, वैजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय यंत्रणेसह अंगणवाडी सेविका, आशा सेविका चौकशीच्या रडारवर आल्या आहेत. आशा सेविका गर्भवती महिलांच्या घरी जाऊन त्यांना आरोग्य सेवा आणि मार्गदर्शन करीत योग्यवेळी वैद्यकीय सुविधा मिळवून देतात. मात्र, या घटनेत कुठल्याही सेविकेने पुढाकार घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
महिलेची घेणार भेट – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद
याबाबत संबंधित महिलेची प्रत्यक्ष भेट घेणार असून, चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.