तरुण भारत लाईव्ह । जळगाव : दिवंगत डॉ. प्रताप दत्तात्रय जाधव यांच्या स्मरणार्थ शनिवारी १५ जुलै रोजी श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा सायंकाळी ६.३० वाजता छत्रपती संभाजी राजे नाट्यमंदिर, महाबळ येथे होणार आहे. कै. डॉ. प्रताप जाधव सामाजिक कार्यात अग्रेसर, वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून सुपरिचित होते तसेच “गरिबांचे डॉक्टर” म्हणून डॉ. जाधव यांची ओळख होती.
केशवस्मृती सेवासंस्था समुह, जळगाव जनता सहकारी बँक, आश्रय माझे घर, आयएमए जळगाव, रोटरी जळगाव ईस्ट अशा सर्वच संस्थांशी त्यांचा जवळून संबंध होता. केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित आश्रय माझे घर या गतिमंद / मतिमंद मुलांच्या संस्थेचे ते अध्यक्ष होते त्यांनी या मुलांसाठी आवश्यक ती वैद्यकीय व इतर मदत वेळोवेळी उपलब्ध करून दिली होती. तसेच जळगाव जनता सहकारी बँकेचे ते पूर्व उपाध्यक्ष होते जळगाव जनता सहकारी बँकेच्या संचालक मंडळ सदस्यांना व कर्मचारी वर्गाला देखील त्यांनी कोरोना काळात धीर दिला व वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली.
कै. डॉ. प्रताप जाधव सामाजिक तसेच आरोग्य क्षेत्राला आपले संपूर्ण जीवन समर्पित केले होते. त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आणि त्यांना विविध संस्थांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या सभेचे आयोजन केले. या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन केशवस्मृती सेवासंस्था समुह, जळगाव जनता सहकारी बँक, आयएमए जळगाव शाखा, रोटरी जळगाव ईस्ट आणि सर्व ग्रामस्थ फुपनगरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.