भुसावळ : खंडव्याहून भुसावळकडे निघालेल्या ट्रकचे चालकाच्या बाजूचे ट्रक अचानक निखळल्याने नियंत्रण सुटून ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. हा अपघात यावल रोडवरील स्मशानभूमीला लागून असलेल्या तापी पुलाजवळ रविवार, 19 रोजी पहाटेच्या सुमारास घडला. या अपघातात ट्रक चालक आसीफखान समदखान (43, न्हावी, ता.यावल) व क्लीनर आशिफ खान (39, न्हावी, ता.यावल) हे जखमी झाले आहे. अपघातानंतर ट्रक उलटल्याने ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून काही पोत्यांमधील गहूदेखील सांडला गेला आहे. अपघातानंतर राहुल नगरातील नागरीकांनी जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात हलवण्यात मदतकार्य केले. या प्रकरणी शहर पोलिसात सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
एक्सलमधून चाक निखळल्याने अपघात
सूत्रांच्या माहितीनुसार, खंडवा येथून भुसावळातील खडका रोड भागातील एका व्यापार्याने गव्हाची खरेदी केल्यानंतर माल पोहोचवण्यासाठी खंडवा येथून शनिवारी रात्री ट्रक (एम.एच.19-7055) हा भुसावळकडे निघाला असताना यावल रोडवरील स्मशानभूमीजवळील तापी पुलाजवळ रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास अचानक ट्रक चालकाच्या बाजूकडील चाकासह एक्सल तुटल्याने ट्रक स्मशानभूमीजवळील खड्ड्यात जावून उलटला. या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले तर ट्रक मधील गहूदेखील सांडला गेला. स्थानिक नागरीकांसह श्यामा रामा सरदारे यांनी न्हावी गावातील चालकासह क्लीनरला स्थानिक डॉ.निलेश महाजन यांच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यात आले. शहर पोलिसांना माहिती कळाल्यानंतर त्यांनी अपघाताची माहिती घेत गव्हाचा माल सुरक्षित राहण्यासाठी दोन होमगार्ड अपघातस्थळी तैनात केले आहेत. एएसआय अंबादास पाथरवट यांनी जखमींची भेट घेत अपघाताची नेमकी माहिती जाणून घेतली. रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता.