तरुण भारत लाईव्ह । २३ फेब्रुवारी २०२३ । हिरव्या भाज्यामध्ये सर्वात आधी पालक चे नाव घेतले जाते. पालक स्वादासोबत च आरोग्यासाठीही उपयुक्त असते. पण बहुतेक करून पालक आणि पालकाची भाजी आवडत नाही. मग पालकाची वडी ही तुम्ही ट्राय करू शकता. पालक वडी ही चवीला रुचकर आणि चमचमीत असते. पालक वडी घरी करायला सुद्धा खूप सोप्पी आहे. पालक वडी घरी कशी बनवली जाते हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
पालक, खोबरं, लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या, आलं, कोथिंबीर, हळद, लाल मिरची पावडर, तेल, मीठ, चणा डाळीचं पीठ व तांदळाचं पीठ.
कृती
सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावा. खोबरं, लसूण, हिरवी मिरची, आलं व कोथिंबीर यांचं वाटण तयार करावं. चिरलेल्या पालकामध्ये ३ ते ४ चमचे तयार केलेलं वाटण, हळद, लाल मिरची पावडर व थोडं तेल घालावं. त्यात नंतर मावेल तेवढं चणा डाळीचं पीठ, थोडं तांदूळाचं पीठ आणि चवीनुसार मीठ घालून चांगलं एकत्र करा. त्याचे कणकेसारखे लांबट आकाराचे गोळे करा. स्टीलच्या चाळणीला आतून तेल लावून गोळे त्यात ठेवावे. एका गंजात पाणी गरम करून त्यावर चाळणी ठेवून १० मिनिटे हे गोळे वाफवून घ्यावे. त्यानंतर गॅसवरुन उतरवून ते थंड झाल्यावर त्याचे गोल आकारात काप करून तेलात तळावे किंवा परतावे आणि पालक वडी सर्व्ह करावी.