नवी दिल्ली : तूर आणि उडीद डाळच्या वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तूर डाळींची मोठ्या प्रमाणात आयात होऊनही हा साठा बाजारात पोहचत नव्हता. होर्डिंगच्या माध्यमातून जाणीवपूर्वक बाजारात तूर डाळीचा तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. होर्डिंगमुळे तूर डाळीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यातच केंद्र सरकारने तूर डाळीच्या साठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि होर्डिंग मार्केटमध्ये तूर डाळ कमी असलेल्यांची ओळख करून कारवाई करण्याचा निर्णय घेतला होता.
तूर आणि उडीद डाळीच्या काळाबाजारासंदर्भात ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या पथकाने देशातील ४ राज्यांतील १० ठिकाणांना भेटी दिल्यात. या पथकाला गोदामांमध्ये तूर आणि उडीद डाळीचा साठा मोठ्या प्रमाणात आढळून आला आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने स्थापन केलेल्या पथकाने ही शोधमोहीम राबवली. या मोहिमेनंतर येत्या काही दिवसांत तूर आणि उडीद डाळीच्या दरात काहीशी कपात होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.