भुसावळ : टॉवर वॅगनच्या धडकेने चौघे रेल्वे कर्मचारी चिरडले जावून ठार झाल्याची घटना मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी पहाटे सहा वाजता घडली होती. या घटनेची रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत अपघाताला कारणीभूत असलेल्या चालक आर.एन.पाटील यांच्यासह तिघांचे तत्काळ निलंबन केले असून रेल्वे बोर्डाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, रेल्वे चालक आर.एन.पाटील यांच्यासह कनिष्ठ अभियंता हेमंत ठाकूर यांना लासलगाव पोलिसांनी अटक केली आहे.
अपघाताची होणार उच्चस्तरीय चौकशी
भुसावळ विभागीय स्तरावरील उच्चपदस्थ अधिकारी या अपघाताची चौकशी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सोमवारी सकाळी सहा वाजता घडलेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे कर्मचार्यांनी रेल्वे रोको आंदोलन केल्यानंतर अनेक रेल्वे गाड्यांचा खोळंबा झाला तर अप-डाऊन मार्गावर धावणार्या अनेक गाड्या तासभर उशिराने धावल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.
गोदावरी एक्स्प्रेस रोखली
रेल्वे लाईन दुरुस्तीच्या कामासाठी आलेल्या टॉवर वॅगनच्या धडकेने चार ट्रॅक मेन्टनन्स करणारे कर्मचारी चिरडले गेल्यानंतर संतप्त रेल्वे कर्मचार्यांनी रेल्वे प्रशासनाच्या कारभाराविषयी संताप व्यक्त करीत लासलगावजवळ मुंबईला जाणारी गोदावरी एक्स्प्रेस रोखून धरली. सुमारे 25 मिनिटे गाडी थांबून होती. दुर्घटनेची माहिती कळताच डीआरएम एस.एस. केडीया, एडीआरएम सुनील कुमार सुमंत, डीसीएम अनिल पाठक यांच्यासह सर्व उच्च पदस्थ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी पाहणी केली. स्थानिक पोलिसांसह रेल्वे सुरक्षा बलाने मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला होता.
अप-डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत
लासलगाव जवळ झालेल्या दुर्देवी घटनेनंतर रेल्वे कर्मचार्यांमध्ये खळबळ उडाली. भुसावळ स्थानकावरून सुटणार्या गाड्यामध्ये गोवा एक्स्प्रेस एक तास, मुंबई लखनऊ सुपरफास्ट, साकेंत एक्स्प्रेस, भागलपूर – एलटीटी एक्स्प्रेस व काशी एक्सप्रेस या गाड्या नियोजीत वेळेपेक्षा 30 मिनीटे ते एक तास विलंबाने धावल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. मुंबईकडून येणार्या काही गाड्या सुध्दा नियोजीत वेळेपेक्षा 20 ते 30 मिनीटे विलंबाने भुसावळकडे आल्यात तर अनेक स्थानकावर गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या.
उच्चपदस्थ अधिकार्यांकडून अपघाताची चौकशी : त्या चालकाचे निलंबन
लासलगावजवळ घडलेल्या दुर्घटनेची रेल्वे बोर्डाकडून दखल घेण्यात आली असून या दुर्देवी घटनेची चौकशी भुसावळ विभागातील रेल्वेचे वरीष्ठ विभागातील अधिकारी करतील, अशी माहिती वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक डॉ.शिवराज मानसपूरे यांनी दिली. रेल्वे कर्मचार्यांना चिरडणार्या रेल्वे चालकाला तत्काळ सेवेतून निलंबीत करण्यात आल्याचेही डॉ.मानसपूरे म्हणाले. उच्च पदस्थ अधिकार्यांकडून झालेल्या चौकशीा अहवाल मध्य रेल्वेचे जीएम यांना सादर होऊन हा अहवाल रेल्वे बोर्डाकडे पाठविला जाणार आहे.