भुसावळ : शहरातील एका लॉजमध्ये थांबलेल्या दोन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी अटक केल्यानंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणात पोलिसांनी पुणे येथून दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मूळच्या बांगलादेशातील दोन तरुणी दिल्लीहून मुंबईकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. प्रवासादरम्यान त्या भुसावळमधील एका लॉजमध्ये थांबल्या. त्यांनी लॉजमध्ये दाखवलेले आधार कार्ड हे संशयास्पद वाटल्याने लॉज व्यवस्थापकाने पोलिसांना याची माहिती दिली. बाजारपेठ पोलिस स्टेशनच्या पथकाने तत्काळ कारवाई करत दोन्ही महिलांना ताब्यात घेतले. तपासात आधार कार्ड बनावट असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
पुण्यातून घेतले पती-पत्नीला ताब्यात
तपासात पोलिसांनी पुणे येथून रंगा देवअप्पा अरकरी (वय ४५) व कुलमणी रंगा अरकरी (३६) या दोघांना अटक केली आहे.
पोलिसांनी सांगितले की, हे पती-पत्नी असून पत्नी पश्चिम बंगालची व पती कर्नाटकचा रहिवासी आहे.
दरम्यान, गुरुवारी या दोघांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ३१ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत. बांगलादेशी महिला भुसावळात थांबल्याचे समोर आल्यानंतर या प्रकरणी सखोल तपास सुरु आहे.
पिस्तूल घेऊन फिरायचा, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
भुसावळ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जवळ गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी गुरुवारी दुपारी १:३० वाजता अटक केली. खडका गावाकडे जाणाऱ्या वीट भट्टीजवळील रस्त्यावर नीलेश अनंत पारधे (वय २१, रा. छाया देवी राका नगर, भुसावळ) हा तरुण कमरेला गावठी पिस्टल खोचून सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरवत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडून गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक राजू सांगळे, विजय नेरकर, महेश चौधरी, अमर आढाळे, राहुल वानखेडे व हर्षल महाजन यांनी केली.