जळगाव : रस्त्याने जात असताना दोन संशयितांनी कारागिरास मारहाण करत खिशातून १७ हजार ५०० रुपयांची रोकड हिसकावून घेतली. ही घटना मंगळवारी (८ एप्रिल) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास शहरातील शिवाजीनगर ते सुरत रेल्वे गेट रोडवर बौद्ध विहारजवळ घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले.
रवींद्र बाबुलाल लुले मिस्तरी (वय ४७, रा. राजमालती नगर) हे बांधकाम कारागीर आहेत. ते रस्त्याने जात असताना दोन संशयितांनी रवींद्र लुले यांना अडवित मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या खिशातून जबरीने रोकड हिसकावून घेत पलायन केले.
या प्रकरणी रात्री तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळी पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी जाऊन प्रकार जाणून घेतला.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून शेख हर्शद शेख हमीद (वय २६, रा. सिटी कॉलनी) वसिम अली शहाबुद्दीन तेली (वय ३५, रा. फातिमानगर) यांना ताब्यात घेतले. साहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र शिखरे हे तपास करीत आहेत.
मद्यपीने फोडल्या कारच्या काचा
जळगाव : काहीएक कारण नसताना दारूच्या नशेत असलेल्या एकाने घरासमोर लावलेल्या कारच्या पुढील व मागील काचा फोडून नुकसान केले. बुधवारी (९ एप्रिल) साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना शहरातील बळीरामपेठेत दुर्गादेवी मंदिराच्या गल्लीत घडली. गणेश वसंतराव कुलकर्णी (वय ५१, रा. बळीरामपेठ) हे व्यावसायिक आहेत. त्यांच्या मालकीची कार (एमएच १९- ईजी ९१२०) त्यांनी घरासमोर पार्किंग केलेली होती. संध्याकाळी दारूच्या नशेत संशयित तेथे आला. काहीएक कारण नसताना त्याने कारच्या काचा फोडून नुकसान केले. या प्रकरणी तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात संशयित मुजाहिद शेख उर्फ गण्या (रा. मोहाडी रोड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक वाहेद तडवी हे तपास करीत आहेत.