Maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर उभा राहिला आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील निकालाने राजकीय समीकरणे स्पष्ट केली असून राज्यातील जनतेने “खरी शिवसेना कोणाची?” या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर शिवसेनेत फूट पडली. 40 आमदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मान्य करून भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे फक्त 15 आमदार उरले. या फूटीनंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला “शिवसेना” पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिले.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 57 जागांवर विजय मिळवला, तर ठाकरे गटाला फक्त 20 जागांवर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे मुंबईतील निम्म्या जागा ठाकरे गटाने जिंकल्या असल्या, तरी शिंदे गटाने मुंबईतही प्रभावी कामगिरी केली आहे.
ठाकरे गटाला दोन धक्के
धुळ्याचे सह-संपर्क प्रमुख हिलाल माळी यांनी आपल्या हजारो समर्थकांसह शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर ऐरोलीचे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर यांनीही शिंदे गटाची वाट धरली. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिकांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षातील ही उलथापालथ उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.
पक्ष बांधणीसाठी कसोटीचा काळ
पक्ष चिन्ह, आमदार, खासदार, आणि स्थानिक नेत्यांच्या गटांतरांमुळे उद्धव ठाकरे यांना पक्ष मजबूत ठेवण्यासाठी मोठी मेहनत करावी लागणार आहे. शिवसेनेतील फूट, चिन्हाची हानी, आणि निवडणुकीतील अपयश या सगळ्यामुळे ठाकरे गटासाठी येणारे दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.