पुणे : पिंपरी चिंचवड येथील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते मागच्या बर्याच दिवसांपासून आजारी होते. त्यांच्या मागे पत्नी अश्विनी, कन्या एश्वर्या, बंधू माजी नगरसेवक शंकर आणि विजूअण्णा जगताप असा मोठा परिवार आहे. आमदार जगताप यांच्या निधनाने शहरावर शोककळा पसरली आहे. भाजपने मागच्या १२ दिवसांत दोन आमदार गमावले आहेत. पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक यांचे २२ डिसेंबर रोजी निधन झाले आहे.
दरम्यान, भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे दोघेही मागच्या बर्याच दिवसांपासून आजारी होते. मुक्ता टिळक या कॅन्सरग्रस्त होत्या. त्या मागच्या बर्याच दिवसांपासून उपचार घेत होत्या. त्याचबरोबर लक्ष्मण जगताप यांनासुद्धा अनेकवेळा खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते पण आज अखेर त्यांची प्राणज्योत मावळली. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
राजकीय वाटचाल
पिंपरी चिंचवड शहरातील राजकारणात गेली ३५ वर्षे चार वेळा नगरसेवक, चार वेळा आमदार राहिलेले जगताप यांच्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत २०१७ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता आली होती. जगताप १९८६ मध्ये प्रथम नगरसेवक झाले. नंतर स्थायी समिती अध्यक्ष होण्याची संधी त्यांना मिळाली. सन २००० मध्ये ते शहराचे महापौर होते. पुढे हवेली विधानसभेसाठी प्रबेळ दावेदार म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते, पण विलास लांडे यांना संधी मिळाली होती. नंतर विधान परिषदेसाठी पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून त्यांनी काँग्रेसचे चंदूकाका जगताप यांचा पराभव केला होता.
२००९ मध्ये चिंचवड विधानसभेसाठी त्यांनी अपक्ष उमेदवारी करून शिवसेनेचे आताचे खासदार श्रीरंग बारणे यांचा पराभव केला आणि विजयश्री खेचून आणली होती. नंतर मावळ लोकसभा मतदारसंघातून शेकापचे उमेदवार म्हणून त्यांनी अत्यंत कडवी झूंज दिली, पण तिथे श्रीरंग बारणे हे शिवसेनेकडून विजयी झाले. नंतरच्या काळात बदलती राजकिय समिकरणे लक्षात घेऊन त्यांनी राष्ट्रवादी सोडून सरळ भाजपामध्ये प्रवेश केला आणि चिंचवड विधानसभेतून आमदारकी केली. २०१९ मध्येही ते मोठ्या मताधिक्याने जिंकले आणि चौथ्यांदा आमदार झाले. २०१७ मध्ये अजित पवार यांच्या ताब्यातील पिंपरी चिंचवड महापालिकेची सर्व सूत्रे केवळ आमदार जगताप यांच्यामुळे भाजपाकडे आली.