फैजपूरातील तिघे लाचखोर पोलिस कारवाईच्या कोठडीत

भुसावळ : पत्त्याच्या क्लबवर कारवाई न करता क्लब सुरळीत सुरू राहू देण्यासाठी तडजोडीअंती चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना फैजपूर पोलिस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचार्‍यांना जळगाव एसीबीने पोलिस ठाण्यातच शुक्रवारी दुपारी तीन वाजता अटक केली. सहाय्यक फौजदार हेमंत वसंत सांगळे (52, भारत एंटरप्रायजेस मागे, यावल रोड, फैजपूर), पोलिस नाईक किरण अनिल चाटे (44, रा.विद्या नगर, फैजपूर) व नाईक महेश ईश्वर वंजारी (38, रा.लक्ष्मी नगर, फैजपूर) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत. पोलिस ठाण्यातच पोलिसांना अटक करण्यात आल्याने पोलिस वर्तुळातील लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलिस ठाण्यातच स्वीकारली लाच
पाडळसे येथील 30 वर्षीय तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा बामणोद येथे पत्त्यांचा क्लब असून बामणोद बीटसाठी सांगळे व चाटे यांच्याकडे जवाबदारी आहे. तक्रारदाराच्या पत्त्याच्या क्लबवर कोणतीही जुगाराची कारवाई न करता जुगाराचा क्लब सुरळीत सुरू ठेवण्यासाठी दरमहा चार हजार रुपये देण्याची मागणी शुक्रवारी करण्यात आली होती शिवाय सांगळे यांनी त्यांच्या फोनवरून नाईक चाटे यांच्याशी बोलणी करून दिल्यानंतर सांगळे यांनी पोलिस ठाण्याच्या आवारातच लाच स्वीकारून ती रक्कम नाईक वंजारी यांना दिल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली. दोघा आरोपींनी दर महिन्याला तीन हजार व गोपनीय शाखेतील कर्मचार्‍यांसाठी एक हजारांची मागणी केल्याचे एसीबीला मिळालेल्या संभाषणात स्पष्ट झाले आहे त्यामुळे आगामी काळात आणखी काहींवर कारवाई शक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक एस.के.बच्छाव, निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, नाईक ईश्वर धनगर, कॉन्स्टेबल राकेश दुसाने, सुरेश पाटील, अशोक अहिरे, सुनील पाटील, रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, जनार्दन चौधरी, किशोर महाजन, सुनील वानखेडे, बाळु मराठे, प्रदीप पोळ, सचिन चाटे, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकुर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.