---Advertisement---
जळगाव : दोन मित्र गप्पा करत असताना दुचाकीवरुन आलेल्या चौघांनी जुन्या वादाच्या कारणातून मित्रावर चाकुने वार केला. तर सोबतच्या दुसऱ्या मित्राला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. ही घटना खाबोटे कंपनीजवळ विक्की रेस्टारंटजवळ घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
शंतनु चंद्रकांत गुरव (वय १९ रा. पंढरपुरनगर) या तरुणाच्या तक्रारीनुसार, रात्री शंतनु हा त्याचा मित्र अनिकेत उर्फ सोनु निंबाळकर असे दोघे जण गप्पा मारत उभे होते. त्याठिकाणी तीन दुचाकीवर बसुन चौघे जण आले. मागील वादाचे निमित्त पुढे करत दोघा संशयितानी अनिकेत उर्फ सोनु निंबाळकर याच्यावर चाकुने वार करत दुखापत केली.
अन्य संशयितांच्या दोघा साथीदारांनी शंतनु याला चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच शंतनु याच्या खिशातून दोन हजार रुपये, आधार कार्ड काढून घेत पसार झाले. या प्रकरणी दीपक पटेल, कुणाल पाटील, राहुल भोसले, प्रवीण राठोड (सर्व रा. कुसुंबा, ता. जळगाव) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हे तपास करीत आहेत.