---Advertisement---
न्हावी ता यावल : गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून, सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत असलेल्या न्हावी मोर धरण भरून वाहू लागले आहे. धरणात ८५ टक्के जलसाठा झाल्याने प्रशासनाने दोन दरवाजे उघडून १५०.९६ क्युसेस पाणी मोर नदीच्या पात्रात सोडले आहे. विशेषतः या वर्षी पहिल्यांदाच मोर नदीतून पाणी सोडण्यात आले असून, यामुळे न्हावी परिसरात शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून, अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे मोर नदीला आता आतापर्यंत एकही पूर गेलेला नसल्यामुळे शेतकरी खूप नाराज झाले होते. विहिरीला पाणी येते की नाही या संकटात पडले होते, परंतु गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे मोर नदीचे धरण 85 टक्के भरले आहे. यामुळे प्रशासनाने दोन दरवाजे 150 .96 क्युरेक्स पाणी नदीपात्रात सोडले असून, शेतकरी वर्ग आनंदीत झाला आहे.
मागील काही दिवसांपासून सातपुडा परिसरात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे आज दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी प्रशासनाने नियोजित निर्णय घेऊन धरणाचे दोन दरवाजे उघडले आणि पाणी नदीपात्रात सोडले.
सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मोर नदीमध्ये पुन्हा एकदा जीवन संचार झाला असून, विशेषतः मारूळ, न्हावी, आमोदा, वनोली, कोसगाव, पाडळसा या गावांतील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. जर हे पाणी कोसगावपर्यंत पोहोचले, तर संबंधित गावांतील भूगर्भजलपातळी वाढून विहिरींना आणि पाणवठ्यांना आधार मिळेल, असा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.
या पावसाळ्यात सातपुड्यात आणखी आठ-दहा दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याने नदीला संभाव्य पूर येऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदी पात्रात उतरणे टाळावे आणि जीवित वा पशुधनाची हानी होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
या जलप्रवाहामुळे यावल तालुक्यातील शेतशिवाराला नवी उमेद मिळाली असून, शेतकरी वर्गाला खरीप हंगामासाठी मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. न्हावी परिसरातील पाझर तलाव अद्यावत कोरडाच आहे. न्हावी मोर नदीला संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत अजून पर्यंत पाणी आलेले नाही.