धुळ्यातील दोन लाखांचे लाच प्रकरण ः दोघा आरोपींना 12 पर्यंत पोलिस कोठडी

धुळे : शासकीय विद्युत ठेकेदाराने केलेल्या कामाचे बिल काढून देण्यासाठी तडजोडीअंती दोन लाखांची लाच स्वीकारताना धुळ्यातील वीज कंपनीचे वित्त व लेखा व्यवस्थापक अमर अशोक खोंडे (41) व उपव्यवस्थापक मनोज अर्जुन पगार (46) यांना बुधवारी सायंकाळी वीज कंपनीच्या कार्यालयातूनच अटक करण्यात आली होती. संशयीतांना गुरुवारी धुळे न्यायालयात हजर केले असता 12 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दोन लाखांची अधिकार्‍यांना भोवली लाच
शासकीय विद्युत ठेकेदार असलेल्या तक्रारदाराने धुळे व दोंडाईचा विभागासह धुळे ग्रामीणमध्ये डीपीडीसी अंतर्गत मंजूर निधीतून 2018-2019 मध्ये काम केले व या कामाचे बिल 56 लाख 31 हजार 590 रुपये काढून देण्यासाठी अधिकार्‍यांची भेट घेतली असता दोघा आरोपींनी पाच लाखांची लाच मागितली व अडीच लाखात तडजोड झाल्यानंतर त्यात पहिला हप्ता दोन लाख रुपये बुधवारी मागितला. तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली व बुधवारी सायंकाळी उशिरा धुळ्यातील कार्यालयात आरोपींनी लाच स्वीकारताच दोघांना अटक करण्यात आली. तपास धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक प्रकाश झोडगे व सहकारी करीत आहेत.