Dhule Crime News : धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार; एक गर्भवती, दुसरीची प्रसूती

धुळे : जिल्ह्यात दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. एका अल्पवयीन मुलीने अत्याचारातून एका मुलीला जन्म दिला. तर दुसऱ्या घटनेत अत्याचारातून अल्पवयीन मुलगी पाच महिन्यांची गर्भवती राहिली आहे. या प्रकरणी शिरपूर व निजामपूर पोलिसात संशयित आरोपीविरुध्द लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून, ऑक्टोबर २०२४ मध्ये संशयित तरुण (रा. कोर्डे, ता. साक्री) याने कोर्डे गावातील एका अल्पवयीन मुलीवर तिचे आई-वडील घरी नसताना अत्याचार केले. यातून ती पाच महिन्यांची गर्भवती राहिली.

शिवाय त्याने घटनेची कुठेही वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी पीडितेला दिली होती. अखेर पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून निजामपूर पोलिसात संबंधित तरुणाविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला.

हेही वाचा : रात्री अचानक आला आवाज अन् पत्नीचं फुटलं बिंग, पुढे काय झालं?

दुसऱ्या घटनेत पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, साधारण दहा महिन्यांपूर्वी मालकातर येथील राहत्या घरात संशयित आरोपी (रा. घोटाळी, ता. शहादा, जि. नंदुरबार) याने अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले.

यातून पीडिता गर्भवती राहिली. पीडितेला त्रास होऊ लागल्याने तिला शहादा येथे रुग्णालयात दाखल केले असता, १० रोजी सकाळी पीडितेने एका मुलीला जन्म दिला. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलिसांत तरुणाविरुद्ध लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.