---Advertisement---
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील खलाणे गावात एक अत्यंत हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. मुरूमने भरलेल्या एका भरधाव डंपरचे ब्रेक अचानक फेल झाल्याने हा डंपर रस्त्याच्या कडेला बसची वाट पाहत उभ्या असलेल्या प्रवाशांवर काळ बनून धावला.
या भीषण अपघातात दोन निष्पाप प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, त्यात उपचारासाठी जाणारा मजूर आणि पतीच्या निधनाच्या मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी महिलेला बाहेरगावी प्रवासाला घेऊन जाणाऱ्या महिलेचा मृत्यू झाला. अपघातात दोन निष्पाप लोकांचा जीव गेल्याने खलाणे गावात शोककळा पसरली आहे.
मृतकांमध्ये मका पारशा पावरा (वय ५३, रा. ब्राह्मणपुरी, ता. शहादा) या परगावहून मजुरीसाठी आलेल्या कामगाराचा समावेश आहे. पावरा हे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी खलाणे येथे आले होते. प्रकृती ठीक नसल्याने ते उपचारासाठी धुळे येथे दवाखान्यात जात असताना, रस्त्यातच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांच्या निधनाने मूळ गावात शोककळा पसरली आहे.
अपघातात आशाबाई रूपचंद भिल (वय ५३) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आशाबाई आपल्या जिवाभावाची मैत्रीण लताबाई शिवाजी भिल (वय ४०) यांना घेऊन बाहेरगावी जात होत्या. लताबाईच्या पतीचे नुकतेच निधन झाल्यामुळे त्या शोकात होत्या आणि या दुःखातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आशाबाई हा आधार देत होत्या. मात्र, नियतीने घात केला आणि या प्रवासात आशाबाईंचाच अपघाती अंत झाला.
दरम्यान, अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी सुरू केलेले ठिय्या आंदोलन मयतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत, जखमींच्या उपचाराचा खर्च आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याच्या अटीवर मागे घेतले.