भुसावळ : शहरातील अकबर टॉकीज डॉ. फिरोज खान यांच्या दवाखान्यात त्यांचे सहकारी मोहम्मद अली आणि आवेश खान यांना मारहाण करण्यात आली. रुग्णालयात विनाकारण बसण्यावरून झालेल्या वादातून ८ जणांच्या टोळीने दोघांवर हल्ला केला.
या प्रकरणी डॉ. फिरोज खान (रा. खडका रोड, भुसावळ) यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी अजीम खान, रजीम खान, कैफ खान, सैफ खान, साहिल खान, सोहेल खान, मजेत खान व शफिक खान (सर्व रा. अकबर टॉकीज परिसर, भुसावळ) यांनी रागाच्या भरात मोहम्मद अली व आवेश खान या डॉक्टरच्या सहकाऱ्यांना बेदम मारहाण केली.
लोखंडी रॉड व लाकडी दांडक्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच आरोपींनी शिवीगाळ करत परिसरात दहशत निर्माण केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राहुल भंडारे करीत आहेत.