Dhule News : धुळ्यात प्रजासत्ताक दिनी दोन आत्मदहनाचे प्रयत्न; काय आहे कारण?

धुळे : आज देशभरात विविध कार्यक्रमांद्वारे प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे. दरम्यान, धुळ्यात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन सोहळ्यादरम्यान दोन आत्मदहनाच्या प्रयत्नांनी एकच खळबळ उडवून दिली. या घटनांमुळे शहरात गोंधळ आणि तणाव निर्माण झाला, पण पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.

शिरपूर येथील गोरक्षक वावड्या पाटील यांनी प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदन सोहळ्यादरम्यान अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. वावड्या पाटील यांनी शिरपूर शहरात होणारी अवैधरित्या गोवंशाची वाहतूक पोलिस अधिकारी पीआय के. के. पाटील थांबवत नसल्याने आरोप करत आत्मदहना प्रयत्न केला. पण त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

त्याच वेळी, धुळ्यातील जैताणे ग्रामपंचायतीतील मनमानी कारभारामुळे दुसऱ्या व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला. समाधान महाले यांनी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत जिल्हा परिषदेच्या आवारात आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

जिल्हा परिषद सीईओ यांच्या अंगरक्षकांनी त्यांना रोखले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, एकाच दिवशी दोन आत्मदहनाचे प्रयत्न धुळे जिल्ह्यात चांगलीच चर्चेचा विषय बनले आहे.

पालकमंत्री जयकुमार रावल यांनी मुख्य शासकीय ध्वजवंदन सोहळ्यात आपल्या भाषणात धुळे जिल्ह्यातील विकासासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. त्यांनी जिल्ह्यात ‘विकासाची गंगोत्री’ आणण्यासाठी तत्पर असल्याचे सांगितले आणि केंद्र शासनाचे पद्मश्री पुरस्कार प्राप्त असलेल्या चैत्राम पवार यांचे अभिनंदन केले.

दरम्यान, आजच्या या घटनांमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे, परंतु पोलिसांच्या त्वरित कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला. मात्र, एकाच दिवशी दोन आत्मदहनाचे प्रयत्न धुळे जिल्ह्यात चांगलीच चर्चेचा विषय बनले आहे.