भारतीय सैन्याने घेतला बदला; कश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

मुंबई : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सुरू आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात भारतीय सैन्याचे तीन वरिष्ठ अधिकारी शहीद झाले. त्यानंतर, सुरक्षा दलांनानी गडोलच्या जंगलात दहशतवाद्यांची लपलेली अनेक ठिकाणे उद्ध्वस्त केली. याशिवाय, बारामुला जिल्ह्यातही सुरक्षा जवानांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू एन्काऊंटरमध्ये आणखी एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आलाय. सकाळपासून सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केलाय. जोपर्यंत अतिरेक्यांचं नामोनिशना मिटत नाही, तोपर्यंत हे ऑपरेशन सुरूच राहणार असल्यांच भारतीय लष्कराने म्हटलं आहे.

उरीच्या हथलंगा भागात सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. अनंतनागच्या जंगलात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेल्या चकमकीचा आज चौथा दिवस आहे. दोन ते तीन लश्कर-ए-तैयबाचे दहशतवादी डोंगराळ भागात लपले असण्याची शक्यता आहे. कमांड कंट्रोल वाहन हायटेक सीसीटीव्ही आणि 360 डिग्री कॅमेऱ्याद्वारे दहशतवाद्यांवर लक्ष ठेवलं जातय. ड्रोनद्वारे जंगलात दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. भारतीय सैन्याच दहशतवादविरोधी ऑपरेशन युनिट, जम्मू-काश्मीर पोलीस स्पेशल टीम आणि पॅरा कमांडोज या ऑपरेशनमध्ये आहेत.

डोंगराळ भागात छोट्या नैसर्गिक गुहा असल्याने सैनिकांना कारवाईत वेळ लागत आहे. प्रत्येक गुहेत दहशतवादी लपलेले असू शकतात, त्यामुळे सुरक्षा दल सावधपणे पुढे जात आहे. दरम्यान, बारामुला येथेही सुरक्षा जवान आणि बारामुला पोलिसांच्या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात येत आहे. उरी व हशलंगा परिसरात दहशतवादी व सैन्य दलाच्या जवानांमध्ये चकमक सुरू होती. जवानांनी या चकमकीत दोन दहशवाद्यांना कंठस्नान घातल्याचे काश्मीर झोनच्या पोलिसांकडून सांगण्यात आले.

दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी जवानांनी शुक्रवारी आधुनिक शस्त्रांचा वापर केला. यामध्ये UBGL,ग्रेनेड लाँचर आणि आयईडी स्फोट करण्यात आले. तसेच, मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांचे नेमके ठिकाण शोधण्यासाठी ड्रोन आणि स्निफर डॉगचीही मदत घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरण्यात आले असून त्यांचे पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.

सुरक्षा दलाने या ऑपरेशनचे एक ड्रोन फुटेज उघड केलं आहे. त्यात अतिरेकी पळताना दिसत आहे. तर अजून तीन ते चार अतिरेकी या जंगलात दबा धरून बसले आहेत. त्यांनाही यमसदनी पाठवलं जाणार आहे. त्यासाठी जंगलात मोर्टार डागले जात आहेत. ड्रोनचाही वापर केला जात आहे. सुरक्षा दलाने आतापर्यंत या जंगलातील तीन ते चार अतिरेक्यांना कंठस्नान घातलं आहे. भारतीय लष्कराला अतिरेक्यांविरोधातील ऑपरेशनमध्ये यश आलं आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस महासंचालक (काश्मीर) विजय कुमार यांनी दिली आहे.