---Advertisement---
धुळे : चाळीसगाव रोड पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोरट्याला अटक करून त्याच्याकडून तब्बल ४ लाख ७० हजार रुपये किमतीच्या १० चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे दुचाकी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले असून, गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
५ मार्च रोजी गफुरनगर येथील मुहम्मद कैसर मुहम्मद इल्यास अन्सारी यांची एमएच १८ एयु ९५८६ क्रमांकाची दुचाकी सोना कब्रस्तान बाहेरून चोरीला गेली होती. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. पोलिस निरीक्षक सुरेश घुसर यांच्या नेतृत्वाखालील शोधपथकाने तपास सुरू केला.
गोपनीय माहितीच्या आधारे, शंभर फुटी रस्त्यावर फिरत असताना एक संशयित इसम पोलिसांना मिळाला. चौकशी केली असता त्याने आपले नाव शेख सलीम असे सांगितले. त्याने दुचाकी चोरीची कबली दिली त्याच्याकडून एकूण १० दुचाकी जप्त करण्यात आल्या. यातून आणखी दोन चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.
शेख सलीमचा एक साथीदार अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. त्याला अटक झाल्यावर आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
ही कामगिरी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, हरीश पाटील, अविनाश वाघ, नीलेश देवरे, शोएब बेग, अतिक शेख, सचिन पाटील, नीलेश चव्हाण, विनोद पाठक, संदीप वाघ, धीरज सांगळे, राकेश मोरे, अभिलेश बोरसे यांच्या पथकाने केली.