दुचाकी चाेरटे पाेलिसांच्या जाळ्यात; ३४ दुचाकी जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

जळगाव : शहरासह जिल्ह्यात दुचाकी वाहनांची चाेरी हाेत असल्याची गंभीर दखल घेत जिल्हा पाेलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला कामाला लावले आहे. बोदवड स्थानिक गुन्हे शाखेने पाच दिवसात चाेरी झालेल्या तब्बल ३४ दुचाकी जप्त केल्या. त्यांच्या या कामगिरीबद्दल पाेलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बोदवड शहरातील विजय पुंडलिक माळी यांच्या मालकीची दुचाकी ( क्रमांक एम एच १९ सीए ५१८७ ) १९ जून रोजी अज्ञात चोरटयांनी चोरून नेली होती. याबाबत त्यांनी बोदवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार बोदवड पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत जितेंद्र ऊर्फ दगडु नारायण सोनवणे (३१, रा. वरनगाव, ह.मु.न्यु.हुडको काँलनी भुसावळ) आणि रुपेश ज्ञानेश्वर चौधरी (२६, रा. सिध्देश्वर नगर, वरनगाव ) या दोघांना राहत्या घरुन ताब्यात घेतले.

विश्वासात घेतले, ३४ दुचाकीची कबुली
या दोघांना विश्वासात घेऊन, विचारपूस केली असता त्यांनी बोदवड, मुक्ताईनगर, वरनगाव, नादुंरा, मलकापूर, जळगाव आणि जामोद पोलीस स्टेशन परिसरातून तब्बल ३४ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार बोदवड पोलिसांनी ३४ दुचाकी असा एकूण १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते सत्कार
पोलिस अधीक्षक  डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे, बोदवड पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळसह पोलीस उपनिरीक्षक अकुश जाधव, राजेन्द्र शेजोळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक सुधाकर शेजोळे, पो.हेकाँ रविद्र गुरचळ, शशिकांत शिंदे, शशिकांत महाले, भुषन सोनवणे यांनी कारवाई करून दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. त्यांच्या या कामगिरीबद्दल पाेलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.